मुलीचा शाही विवाह, कोट्यवधींचा खर्च करतंय तरी कोण? आमदाराच्या उत्तराने भुवया उंचावल्या; म्हणाले, कुणी थार देतंय, कुणी मंडप…
Shivangi Singh Wedding : आमदार अनंत सिंह यांच्या मुलीच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. आता या लग्नाच्या खर्चासंबंधी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या शाही विवाह सोहळ्याचा कोट्यवधींचा खर्च कोण करणार याची माहिती खुद्द आमदार महोदयांनीच दिली आहे. ते काय म्हणाले जाणून घेऊयात.

बिहारमधील मोकामाचे आमदार अनंत सिंह यांच्या मुलीच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. लग्नासाठी कोट्यवधी रुपयांची तयारी केली जात आहे. मुलीला देण्यात येणाऱ्या महागड्या भेटवस्तू, पाहुण्यांसाठीची जय्यत तयारी आणि घोड्यांच्या शर्यतीतील बक्षिसं यामुळे या लग्नाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र, एवढा सगळा खर्च नेमका कोण करतंय, असा प्रश्न उपस्थित होत असतानाच अनंत सिंह यांनी याबाबत मोठा खुलासा केला आहे. लग्नाचा बहुतांश खर्च आपले मित्रच करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
‘माझा खर्च होत नाही, मित्रच सगळं करतात’
मुलगी शिवांगी हिच्या लग्नासाठी होणाऱ्या खर्चाबाबत अनंत सिंह यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं. ‘खर्च होत नाही. माझे खूप मित्र आहेत. कोणी थार गाडी पाठवतं, तर कोणी शामियाना म्हणजेच मंडपाची व्यवस्था करतं. कोणी काही ना काही मदत करत असतं. त्यामुळे मला स्वतःला फारसा खर्च करावा लागत नाही,’ असं ते म्हणाले.
त्यांच्या या वक्तव्यामुळे लग्नाच्या खर्चाची चर्चा आणखी रंगली आहे. विशेष म्हणजे, आपल्याकडे असलेल्या 8 ते 10 गाड्याही मित्रांनीच दिल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
जावयाला महागडी कार, मुलालाही मिळणार भेट
अनंत सिंह यांची मुलगी शिवांगी हिचं लग्न 25 नोव्हेंबर रोजी होणार आहे. ऋषिकेश कुमार याच्यासोबत तिचा विवाह होणार असून, होणाऱ्या जावयाला अनंत सिंह लँड रोव्हर डिफेंडर ही आलिशान कार भेट देणार आहेत. या कारची किंमत 2 कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याची चर्चा आहे.
विशेष म्हणजे, याच लग्नसोहळ्यात त्यांचा मुलगा अभिनव याचा मुंज संस्कारही होणार आहे. यावेळी मुलाला बीएमडब्ल्यू कार भेट देण्याची तयारी असल्याचंही सांगितलं जात आहे.
घोड्यांच्या शर्यतीत थार, बाईक आणि स्कूटरचं बक्षीस
मुलीच्या लग्नात केवळ जेवणावळी आणि संगीताचा कार्यक्रम नसणार, तर घोड्यांच्या शर्यतीचंही आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेतील विजेत्याला महिंद्रा थार गाडी, दुसऱ्या क्रमांकाच्या स्पर्धकाला मोटारसायकल, तर तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला स्कूटर दिली जाणार आहे.
4 लाख पाहुण्यांसाठी जेवणाची तयारी
अनंत सिंह यांच्या मूळ गावी लग्नासाठी जवळपास 10 एकरवर भव्य मंडप उभारला जात आहे. या सोहळ्याला जवळपास 4 लाख पाहुणे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पाहुण्यांसाठी 150 हून अधिक खाद्यपदार्थांची मेजवानी ठेवण्याची तयारी आहे. त्यामुळे या लग्नाची बिहारमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.
