
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव प्रचंड वाढला आहे, भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला, त्यानंतर पाकिस्तानने भारतावर हल्ल्याचा प्रयत्न केला, मात्र भारतानं पाकिस्तानचा हल्ला परतून लावला, प्रत्यु्त्तर म्हणून भारतानं केलेल्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचं प्रचंड नुकसान झालं आहे. मात्र तरी देखील पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत, युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर देखील पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं, दुसरीकडे याच दरम्यान आयएमएफकडून पु्न्हा एकदा पाकिस्तानला 100 कोटी डॉलरचं कर्ज देण्यात आलं आहे, मात्र तुम्हाला हे माहिती आहे का? की सध्या कंगाल पाकिस्तानवर किती कर्ज आहे? पाकिस्तान पूर्णपणे कर्जात बुडाला आहे, आणि विशेष म्हणजे पाकिस्तानला पुढील दोन वर्षांमध्ये हे सर्व कर्ज फेडायचं आहे.
पाकिस्तानची संपूर्ण अर्थव्यवस्था सध्या कर्जाच्या कुबड्यांवर सुरू आहे. 1958 मध्ये पहिल्यांदा पाकिस्तानने कर्ज घेतलं होतं, तेव्हापासून ते आतापर्यंत तब्बल 24 वेळा पाकिस्तानने आयएमएफकडे कर्जासाठी हात पसरले आहेत. एवढंच नाही तर पाकिस्तानने इतर परदेशी बँकांकडून देखील मोठ्या प्रमाणात कर्ज घेतलेलं आहे. सध्या पाकिस्तानवर तब्बल 30 बिलियन डॉलर एवढं कर्ज आहे, आणि त्यांना पुढील दोन वर्षांमध्ये ते परतफेड करावं लागणार आहे. त्यामुळे आता पाकिस्तावर प्रचंड दबाव वाढला आहे. मात्र पाकिस्तानची सध्याची हालत पाहाता, पुढील दोन वर्षांमध्ये हे कर्ज ते फेडू शकणार नाहीयेत.
पाकिस्तानला वारंवार कर्ज घेण्याची गरज का पडली?
भारत आणि पाकिस्तानला एका दिवसाच्या अंतरानं स्वातंत्र्य मिळालं. मात्र भारतानं आज मोठी भरारी घेतली आहे, जगामध्ये आपली एक वेगळी ओळख बनवली आहे. मात्र दुसरीकडे दहशतवादानं पाकिस्तानला पोखरून काढलं आहे. दहशतवाद आणि अंतर्गत कलहामुळे पाकिस्तानची आर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे, सध्या स्थितीमध्ये त्यांची विदेशी गंगाजळी बांगलादेशपेक्षाही कमी आहे. पाकिस्तानला आयएमएफकडून तसेच इतर राष्ट्रांकडून जे फंडिग मिळालं, ते विकास करण्यासाठी मिळालं, मात्र पाकिस्तानने त्याचा उपयोग दहशतवाद्यांना पोसण्यासाठी केला. त्यामुळे आता पाकिस्तान कर्जबाजारी बनला आहे.