केजरीवाल यांच्या मुलीला बिश्नोई गँगची जीवे मारण्याची धमकी, 7 कोटी मागितले, मोठी खळबळ
केजरीवाल यांच्या मुलीला 7 कोटींच्या खंडणीसाठी बिश्नोई गँगच्या नावाने जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. पोलिसांनी तपास केला असता ही धमकी खोटी असून, एका व्यक्तीने रोहतकमधून केली होती. 'आप'ने याला पक्षाला बदनाम करण्याचा राजकीय डाव असल्याचे म्हटले आहे. या घटनेने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्याशी संबंधित एक मोठं प्रकरण समोर आलं आहे. केजरीवाल यांची मुलगी हर्षिता केजरीवाल हिला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगने ही धमकी दिली असून हर्षिताकडून 7 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या धमकीची गंभीर दखल घेऊन तपास केला असता ही धमकी खोटी असल्याचं निष्पन्न झालं आहे. बिश्नोई गँगच्या नावाखाली एका व्यक्तीने ही धमकी दिल्याचं उघड झालं आहे.
आम आदमी पार्टीचे आमदार जरनैल सिंग यांनी या प्रकरणी तक्रार नोंदवली होती. या तक्रारीनुसार, 6 नोव्हेंबर रोजी त्यांना एक फोन कॉल आला होता. तसेच व्हॉट्सअपवरून मेसेजही आला होता. समोरच्या व्यक्तीने आपण बिश्नोई गँगचे सदस्य आहोत असं सांगून केजरीवाल यांना 7 कोटी रुपये द्यायला सांगा. पैसे नाही दिले तर केजरीवाल यांची मुलगी हर्षिताची हत्या करण्यात येईल, अशी धमकी या व्यक्तीने दिल्याचं या तक्रारीत म्हटलं आहे.
गुन्हा दाखल
जरनैल सिंग यांनी मोहालीच्या एसएसपीकडे तक्रार नोंदवली आहे. त्या आधारे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी मोबाईल नंबर, कॉल डिटेल रेकॉर्ड, आयपी लॉग आणि लोकेशनचा तपास केला असून एक मोठा खुलासा झाला आहे. मोहाली पोलिसांच्या मते, हा खोटा कॉल होता. तो एका व्यक्तीने केला असून रोहतकमधून हा कॉल आला होता. आम्ही आरोपीचा शोध घेत आहोत, असं पोलिसांनी सांगितलं. तसेच लॉरेन्स बिश्नोई गँगने हा फोन केला नसल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलं.
पक्षाला बदनाम करण्याचा डाव
फोन करणारा एखाद्या राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे का? या अँगलने पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. आरोपीने खोटा कॉल का केला? त्याचा या मागचा हेतू काय आहे? याचा पोलीस शोध घेत आहे. मात्र, पंजाबमध्ये आमचं सरकार असल्याने पक्षाला बदनाम करण्याचा हा डाव असल्याचा आरोप आपने केला आहे. अशा प्रकारचे कॉल करून सरकार आणि पोलिसांची प्रतिमा मलिन केली जात असल्याचंही आपने म्हटलं आहे.
कोण आहे हर्षिता जैन?
हर्षिता जैन ही अरविंद केजरीवाल आणि सुनिता केजरीवाल यांची एकूलती एक मुलगी आहे.
हर्षिताने 2014मध्ये IIT-JEE परीक्षा पास केली होती. त्यानंतर IIT दिल्लीत तिने प्रवेश घेतला होता.
तिने 2018मध्ये केमिकल इंजीनिअरिंगची डिग्री घेतली.
डिग्री घेतल्यानंतर तिने गुरुग्रामच्या बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप (BCG) मध्ये असोसिएट कन्सल्टंट म्हणून काम केलं.
त्यानंतर तिने पती संभव जैन यांच्यासोबत Basil Health नावाचं स्टार्टअप सुरू केलं. हेल्दी फूड आणि कस्टमाइज्ड मीलशी संबंधित या स्टार्टअपची सेवा आहे.
एप्रिल 2025मध्ये हर्षिताचा विवाह संभव जैनशी झाला होता.
