जंतरमंतरवरच यावं लागेल… त्यांच्या घरी जाऊन वेळ वाया घालवणार नाही; आशुतोष रांका आक्रमक

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन तीव्र झाले आहे. प्रवक्ते आशुतोष रांका यांनी आक्रमक भूमिका घेत सरकारला घरी येऊन भेटण्यास नकार दिला. चर्चेसाठी जंतरमंतरवरच यावे लागेल, असे ते म्हणाले. जोपर्यंत प्रधान यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, असा इशारा रांका यांनी दिला.

जंतरमंतरवरच यावं लागेल... त्यांच्या घरी जाऊन वेळ वाया घालवणार नाही; आशुतोष रांका आक्रमक
ashutosh ranka
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 23, 2026 | 10:15 AM

गेल्या चार दिवसापासून दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीचं आक्रमक आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचे देशभर पडसाद उमटले आहेत. देशभरातील तरुण रस्त्यावर उतरून आपआपल्या राज्यात आंदोलन करत आहेत. दुसरीकडे राजकीय पक्षांनीही रस्त्यावर उतरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरलीय. तर संसदेच्या दोन्ही सभागृहातही विरोधकांनी सरकारला या मुद्द्यावर घेरलं आहे. आता सीजेपीचे प्रवक्ते आशुतोष रांका यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. आम्ही कुणाच्याही घरी जाणार नाही. तुम्हाला आमच्याशी बोलायचं असेल तर जंतरमंतरवरच यावं लागेल, अशी आक्रमक भूमिका आशुतोष रांका यांनी घेतली आहे.

काल केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारची भूमिका स्पष्ट केली होती. यावेळी काँग्रेस आणि विरोधक राजकारण करत आहेत. आम्ही संसदेत चर्चेसाठी तयार आहोत. पण विरोधक चर्चा करत नाहीये, असं नड्डा म्हणाले होते. तसेच आंदोलकांशीही चर्चेला तयार असल्याचं नड्डा यांनी स्पष्ट केलं होतं. नड्डा यांच्या या भूमिकेनंतर सीजेपीचे प्रवक्ते आशुतोष रांका यांनी संघटनेची भूमिका जाहीर केली आहे. तसेच नड्डा यांच्या भूमिकेवर टीका केली आहे.

कोर्टही ऐकेल

JP नड्डा यांनी पत्रकार परिषद घेतली ही चांगली गोष्ट आहे. नाहीतर त्यांच्या पक्षातील लोक पत्रकार परिषद घ्यायला देखील तयार नसतात. समोर बोलायला येतायत ते चांगल आहे. अगोदर सरकार ऐकत नव्हतं, आता सरकार ऐकतंय. कोर्ट ऐकत नाही. पण विद्यार्थ्यांचा दबाव वाढला तर कोर्टही ऐकेल, असा आम्हाला विश्वास आहे, असं सांगतानाच पण जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, असं आशुतोष रांका यांनी सांगितलं.

चर्चेला बोलावतंय चांगलंय

सरकार चर्चेसाठी प्रयत्न करतंय हे चांगल आहे. आम्हाला रात्री चर्चेला बोलवलं होत. पण त्यांच्या घरी जाऊन वेळ वाया घालवणार नाही. सरकारने जंतरमंतरवर किंवा वेगळ्या ठिकाणी यावं. त्यांच्या घरात आम्ही जाणार नाही, असं रांका यांनी स्पष्ट केलं.

महाराष्ट्राचे आभार

आंदोलनाला देशभरातून मिळणाऱ्या पाठिंब्यावर त्यांनी आभार मानले. तसेच महाराष्ट्रातून मिळणाऱ्या पाठिंब्यावरही त्यांनी विशेष आभार मानले. महाराष्ट्रातून चांगला पाठिंबा मिळतोय. त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. देशाचा हिरो अभीजित हा महाराष्ट्रातून येतोय. म्हणून संपूर्ण महाराष्ट्र दीपकेच्या मागे उभा राहिला आहे. त्याचा आम्हाला अभिमान आहे. मुंबई, पुणे इतर ठिकाणावरून चांगला पाठिंबा आम्हाला मिळतोय. देशातील अनेक राज्यातून विद्यार्थी जमा होत आहेत. पण आम्ही प्रधानांचा राजीनामा झाल्याशिवाय हटणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

Follow Us