Ayodhya : अयोध्येत चेंगराचेंगरी घडवण्याचा डाव का? मुद्दामून गर्दीच्यावेळी कोणीतरी…
Ayodhya : सध्या महाकुंभसाठी मोठी गर्दी होत आहे. देशभरातून भाविक प्रयागराजला पोहोचत आहेत. तिथून हे भाविक दर्शनासाठी अयोध्या आणि वाराणसीला जात आहेत. सोमवारी संध्याकाळी अयोध्या राम मंदिर परिसरात गर्दी झालेली असताना एक घटना घडली. यामागे मोठं कारस्थान असल्याचा दाट संशय आहे.

उत्तर प्रदेश अयोध्येतून मोठी बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राम मंदिर परिसरात मोठी गर्दी असताना अचानक एक ड्रोन येऊन पडलं. सोमवार संध्याकाळची ही घटना आहे. महाकुंभवरुन अयोध्येला प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासाठी जमलेली गर्दी रांग लावून उभी होती. त्याचवेळी अचानक एक ड्रोन येऊन पडलं. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. मंदिर परिसरात उपस्थित असलेल्या पोलिसांनी लगेचच ते ड्रोन ताब्यात घेतलं. मंदिर परिसरात गोंधळ आणि चेंगराचेंगरी घडवून आणण्याच्या उद्देशाने मुद्दामून कोणीतरी ही घडवून आणल्याचा दाट संशय आहे. पोलिसांनी अज्ज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. हे कोणी केलं? त्याचा शोध पोलिसांकडून सुरु आहे.
सोमवारी संध्याकाळी सातच्या सुमारास भाविक मंदिर परिसरात रांग लावून उभे होते. भरपूर गर्दी झालेली. महाकुंभच्या निमित्ताने भाविक मोठ्या संख्येने अयोध्या, काशी येथे दर्शनासाठी येत आहेत. त्याचवेळी कोणीतरी ड्रोन गर्दीच्या ठिकाणी पाडलं. हा चेंगराचेंगरी घडवून आणण्याचा प्रयत्न असू शकतो. पोलीस अत्यंत बारकाईने या घटनेचा तपास करत आहेत. ज्याने कोणी हे केलय, त्याला लवकरच पकडण्यात येईल. अयोध्येत जो प्रकार घडलाय, त्याची उच्च स्तरीय चौकशी आवश्यक आहे.
शहरापासून 25 किलोमीटर अंतरावर वाहन थांबवली
अयोध्येत सोमवार सकाळपासून भक्तांची गर्दी झाली होती. त्यामुळे शहराच पोलीस दल आणि प्रशासनिक व्यवस्थेवर दबाव वाढला. वाढती गर्दी लक्षात घेऊन हजारो वाहने शहरापासून 25 किलोमीटर अंतरावर थांबवण्यात आली. यामुळे भाविकांना अडचणींचा, त्रासाचा सामना करावा लागला. गर्दीमुळे राम मंदिर, जन्मभूमी पथ आणि हनुमान गढीसह प्रमुख धार्मिक स्थळांकडे जाणारे रस्ते खचाखच भरले आहेत. पुरेशा प्रमाणात पोलिसांची तैनाती नव्हती. गर्दीमुळे तणावाची स्थिती निर्माण झालेली. काही वैतागलेल्या भाविकांनी बॅरिकेड्सही तोडले.
शहरात फिरणं अशक्य बनलय
मोठ्या प्रमाणात भाविक येण्याची शक्यता लक्षात घेऊन रस्त्यांचे रुंदीकरण आणि पायाभूत सुविधा सुधारण्याचे सरकारने प्रयत्न केले. मात्र, अयोध्येच्या अरुंद गल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. यात्रेकरुंच्या गर्दीमुळे शहरात फिरणं अशक्य बनलं आहे.