Delhi Protest : 23 हजार जवान, 37 ठिकाणी नाकाबंदी; CJPच्या आंदोलनाआधी दिल्लीत नेमकी काय तयारी?
दिल्ली मध्ये उद्या होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर आता पोलिसांकडून मोठी तयारी करण्यात येत आहे. आंदोलकांना अडवण्यासाठी आणि वातावरण बिघडू नये यासाठी केंद्र सरकारने पोलिसांची कुमक दिल्ली पोलिसांच्या मदतीला असणार आहे.

धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेण्यात सर्वात महत्त्वाची निर्णायक भूमिका पार पाडणाऱ्या सीजेपीने आता पुन्हा एकदा दिल्लीत दाखल होण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या दिल्लीमध्ये सीजेपीने पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. इंडिया आघाडीने आधीच गेले ३ दिवस दिल्लीमध्ये आंदोलनांची विविध आंदोलने केली आहेत.आता उद्या १० ऑक्टोबर रोजी दिल्लीत होणाऱ्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर सरकारने सुरक्षा व्यवस्था कडक करण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांनी मिळून यासाठी तयारी केली आहे. आंदोलकांनी दिल्लीत पोहोचूच नये यासाठी मेट्रो स्थानकं, रेल्वे सेवा आणि संवेदनशील परिसरावर पाळत ठेवली आहे. तब्बल ५७ मेट्रो स्थानकांवरील प्रवेश आणि बाहेर पडण्याचे मार्गही बंद करण्यात येणार आल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर अभिजीत दिपकेंनी सरकारवर टीका केली आहे, की सरकारने हे सर्वकाही बंद करण्यापेक्षा तुम्ही देशच बंद करा. रेल्वेने नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दीनच्या दिशेनं जाणाऱ्या रेल्वे रद्द करण्याचेही आदेश दिले आहेत.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर केंद्र सरकार आणि दिल्ली सरकार मिळून तब्बल २३,००० जवान तैनात करणार आहे. यासाठी ते ८ तारखेपासूनच तयारीमध्ये आहेत. याशिवाय महिला निमलष्करी दलातील अतिरिक्त जवानांनाही पाचारण करण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, दिल्लीमध्ये आधापासूनच ५ हजार पोलिस कर्मचारी तैनात आहेत. गरजेनुसार ही संख्या १५ हजारपर्यंत वाढवण्यात येणार असल्याचीही शक्यता आहे.
याशिवाय दिल्ली पोलिसांनी आंदोलकांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ३७ ठिकाणी नाकाबंदी उभारली आहे. दिल्लीच्या प्रत्येक जिल्ह्यावर एक एक केंद्र लक्ष ठेवून आहे. या केंद्रांच्या माध्यमातून आंदोलकांना जंतरमंतरवर जाण्यापासून रोखण्यात येणार असल्याची माहिती आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर राजीव चौक, नवी दिल्ली, सेंट्रल सेक्रेटरीएट, जनपथ, मंडी हाऊस, आयटीओ, पटेल चौक, दिल्ली गेट, काश्मिरी गेट, विश्वविद्यालय, खान मार्केट, लाजपत नगर आणि हौझ खास यांसारख्या प्रमुख मेट्रो स्थानकांची प्रवेश आणि बाहेर पडण्याचे दरवाजे बंद करण्याची विनंती दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनला करण्यात आल्याची माहिती आहे. पण अद्याप त्यासंबंधी प्रतिसादाची माहिती उपलब्ध नाही.
दिल्लीला येणाऱ्या काही गाड्या रद्द झाल्याने प्रवाशांना समस्यांचा सामना करावा लागतो आहे. पोलिसांनी सीजेपी आणि इतर संघटनांना आंदोलनासाठी परवानगी दिलेली नाही. दारूची दुकाने दोन दिवस बंद ठेवण्यात आली आहेत. त्याशिवाय हॉटेल आणि गेस्ट हाऊस व पीजीची तपासणी केली जात आहे. तसेच संभाव्य आंदोलकांच्या घरी पोलिस पोहोचणार असून त्यांना ताब्यात किंवा घरीच निगराणीखाली ठेवले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, उद्याच्या आंदोलनाचा परिणाम इंटरनेट आणि कॅब सेवांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
