America Tariff : मोदींच्या त्या फोनने ट्रम्प यांचा मोठा गेम, अमेरिकेचे मित्र देश आता भारतासोबत, होणार जगातील सर्वात मोठी डील
मोठी बातमी समोर येत आहे, डोनाल्ड ट्रम्प यांना आणखी एक धक्का बसला आहे, युरोपीयन संघाकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे, लवकरच भारतासोबत एक मोठी व्यापारी डील होण्याची शक्यता आहे.

युरोपीयन संघाकडून अमेरिकेला मोठा धक्का देण्यात आला आहे, आपल्या व्यापारी धोरणांमध्ये लवकरच नवे बदल करण्यासंदर्भात युरोपीयन संघाकडून स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत. युरोपीयन आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयेन यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे की, अमेरिकेवर असलेलं अवलंबित्व कमी करण्यासाठी तसेच वाढत्या टॅरिफच्या परिणामांपासून वाचण्यासाठी युरोपीयन संघ लवकरच भारतासह इतर अनेक देशांसोबत मोठे व्यापारी करार करणार आहे, उर्सुला वॉन डेर लेयेन या जर्मनीमध्ये एका उद्योजक परिषदेमध्ये बोलत होत्या.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, या वर्षी भारतासोबत एक मोठा व्यापारी करार करण्याची आमची इच्छा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बुधवारी माझं फोनवर बोलणं झालं, त्यांनी देखील या दिशेनं आपली वचनबद्धता पुन्हा एकदा व्यक्त केली आहे. दरम्यान उर्सुला यांचं सार्वजनिक मंचावरील हे वक्तव्य असं दाखवून देत आहे की, अमेरिकेच्या टॅरिफमुळे आता संपूर्ण जगच परेशान झालं आहे, जगातील प्रमुख देशांकडून आता अमेरिकेसोबतच्या व्यापाराऐवजी दुसऱ्या पर्यायाचा शोध घेतला जात आहे, यातील अनेक देश आता भारतासोबत व्यापारी करार करण्यासाठी उत्सुक आहेत.
भारत आणि युरोपीयन संघामध्ये गेल्या काही महिन्यांपासून मुक्त व्यापार करारावर (FTA) चर्चा सुरू आहे, जर हा करार झाला तर युरोपीयन संघ आणि भारतामधील वस्तू, सेवा यांची आदान-प्रदान आणि गुंतवणूक क्षेत्रामधील सामंजस्य आणखी वाढण्यास मदत होणार आहे. युरोपसाठी भारत ही एक वेगानं वाढणारी बाजारपेठ आहे. जर मुक्त व्यापार करार झाला तर त्यामुळे केवळ निर्यातदार आणि गुंतवणूकदारांचाच फायदा होणार नाही तर भारताला युरोपीयन बाजारपेठ सहज उपलब्ध होऊ शकते असं या क्षेत्रातील तज्ज्ञांचं मत आहे.
भारतासोबतच युरोपीयन संघाची दक्षिण अफ्रिका, मलेशिया, आणि युएईसोबत देखील चर्चा सुरू आहे, असंही यावेळी लेयेन यांनी म्हटलं आहे. सप्लाय चैन सुरळीत सुरू राहिली पाहिजे आणि एका देशावर फार अवलंबून राहायला नको, हा या मागचा आमचा उद्देश आहे असं युरोपीयन संघाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
