अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का, प्रसिद्ध नेत्याने साथ सोडली, आम आदमी पार्टीत खळबळ
Avadh Ojha : आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का बसला आहे. प्रसिद्ध शिक्षक अवध ओझा यांनी आम आदमी पक्षाची साथ सोडत राजकारणातून निवृत्ती घेतली आहे.

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का बसला आहे. देशातील प्रसिद्ध शिक्षक अवध ओझा यांनी आम आदमी पक्षाची साथ सोडत राजकारणातून निवृत्ती घेतली आहे. अवध ओझा यांनी आम आदमी पार्टीकडून दिल्लीतील पटपडगंज विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचा दारुण पराभव झाला होता. त्यानंतर आता त्यांनी राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
अवध ओझा यांनी राजकारणातून निवृत्ती घेतल्यानंतर एका पॉडकास्टमध्ये सांगितले की, ‘मी आता पूर्वीपेक्षा जास्त आनंदी आहे. कारण मी माझे विचार आता मोकळेपणाने मांडू शकतो. निवडणूक लढवल्यानंतर मला जाणवले की राजकारण माझ्यासाठी योग्य नाही. पण मी लहानपणापासूनच राजकारणात येण्याचे स्वप्न पाहिले होते. मात्र आता मी त्यातून बाहेर पडत आहे.’
मला राजकारणात थांबायचे होते, पण…
अवध ओझा यांनी या पॉडकास्टमध्ये म्हटले की, ‘मला राजकारणात प्रवेश करण्याची इच्छा होती. मला निवडणूक लढवायची होती. मी ती लढवली पटपडगंजच्या लोकांकडून मला खुप प्रेम मिळाले. मी दुसऱ्या क्रमांकावर राहिलो. पण निवडणूक लढवल्यानंतर मला वाटले की राजकारणात प्रवेश करायला नको होता, त्यामुळे आता मी राजकारणातून निवृत्ती घेतली आहे.’
पुढे बोलताना अवध ओझा यांनी सांगितले की, मी आता पुन्हा राजकारणात प्रवेश करणार नाही. मी आता खूप आनंदी आहे. मी काही काळ शांत होतो. पक्षाच्या बाहेर मी काहीही बोलू शकत नव्हतो. पण आता मला कोणीही फोन करून सांगणार नाही की मी हे बालू नको ते बालू नको. आता मला कोणीही थांबवणार नाही.
अवध ओझा कोण आहेत?
अवध ओझा हे कोचिंग क्षेत्रात खूप लोकप्रिय आहेत. ओझा यांचा जन्म 3 जुलै 1984 रोजी उत्तर प्रदेशातील गोंडा येथे झाला. त्यांना आयएएस अधिकारी व्हायचे होते. पदवीनंतर त्यांनी दिल्लीत येऊन यूपीएससी परीक्षेची तयारी केली. मात्र त्यांना यश मिळाले नाही. त्यानंतर त्यांनी एका कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये शिकवायला सुरुवात केली. त्यांची शिकवण्याची शैली विद्यार्थ्यांना आवडू लागली, त्यामुळे हळूहळू ते लोकप्रिय झाले. अवध ओझा हे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. त्यांचे अनेक विद्यार्थी युपीएससी परीक्षा पास झालेले आहेत.
