अमेरिकेला मोठा धक्का, भारताला मिळाला नवा मित्र, या बलाढ्य देशाची मोठी घोषणा
अमेरिका सातत्यानं भारतावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र ट्रम्प यांच्या निर्णयांमुळे भारतापेक्षा जास्त त्यांचंच नुकसान होत असल्याचं समोर आलं आहे. आता अमेरिकेला आणखी एक मोठा झटका बसला आहे.

अमेरिका सातत्यानं भारतावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, सुरुवातीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला. भारत रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून आपण टॅरिफ लावल्याचं त्यांनी म्हटलं होतं. मात्र त्यानंतरही भारतानं रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवली आहे, दरम्यान टॅरिफनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी एच 1बी व्हिसाबाबत मोठा निर्णय घेतला आहे, त्यांनी एच 1-बी व्हिसाच्या शुल्कामध्ये मोठी वाढ केली आहे. आता या व्हिसासाठी एक लाख डॉलर म्हणजेच जवळपास 88 लाख रुपयांच्या आसपास पैसे मोजावे लागणार आहेत, याचा सर्वाधिक फटका हा भारताला बसणार आहे. दरम्यान ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर आता लवकरच या व्हिसाबाबत अमेरिकेत असलेली लॉटरी पद्धत देखील बंद होणार आहे. त्यामुळे आता भारतीय व्यक्तीला नोकरीसाठी अमेरिकेत एन्ट्री मिळवणं आणखी अवघड होणार आहे.
परंतु एक दिलासादायक बातमी समोर आली आहे ती म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेल्या निर्बंधांनंतर युरोपमध्ये असे अनेक देश समोर आले आहेत, ज्यांना भारतामधील कुशल मनुष्यबळाची गरज आहे. भारतामधील जर्मनीचे राजदूत असलेले फिलिप एंकरमॅन यांनी ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयानंतर आता भारतीयांनी जर्मनीमध्ये उपलब्ध असलेल्या आयटी, विज्ञान आणि मॅनेजमेंट क्षेत्रातील संधीचा फायदा घेतला पाहिजे असं आवाहन केलं आहे.
जर्मनीच्या राजदूतांनी आपल्या ट्विटरवर या संदर्भात एक पोस्ट केली आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हटलं की, सर्व उच्चशिक्षित आणि कुशल भारतीय लोकांना मी आवाहन करतो की, त्यांनी आपल्या करिअरसाठी जर्मनीमध्ये यावं. जर्मनीमध्ये आयटी, मॅनेजमेंट, विज्ञान या सारख्या क्षेत्रामध्ये भारतीयांना प्रचंड संधी उपलब्ध आहे.दरम्यान हा आता अमेरिकेसाठी जर्मनीचा धक्का मानला जात आहे. एकीकडे ट्रम्प यांनी लावलेल्या शुल्कामुळे भारताचं तर नुकसान होणारच आहे, सोबतच अमेरिकेमध्ये देखील भविष्यात कुशल मनुष्यबळाची कमतरता जाणवू शकते असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. अमेरिकेला याचा फटका बसू शकतो.
