कोरोनाच्या सवलतींची मुदत संपणार, 1 सप्टेंबरपासून सामान्यांच्या खिशावर परिणाम करणारे मोठे बदल

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनलॉक-4 अंतर्गत 1 सप्टेंबरपासून अनेक मोठे बदल होणार आहेत (Big Changes from 1 September).

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:35 PM, 29 Aug 2020
कोरोनाच्या सवलतींची मुदत संपणार, 1 सप्टेंबरपासून सामान्यांच्या खिशावर परिणाम करणारे मोठे बदल
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि नॅशनल ई-गव्हर्नन्स डिव्हिजन (एनजीडी) यांनी उमंग (न्यू-एज गव्हर्नन्ससाठी युनिफाइड मोबाइल ऍप्लिकेशन) विकसित केले आहे, जेणेकरून भारतात मोबाइल गव्हर्नन्सला चालना मिळेल.

नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनलॉक-4 अंतर्गत 1 सप्टेंबरपासून अनेक मोठे बदल होणार आहेत (Big Changes from 1 September). याचा सामान्य नागरिकांच्या आयुष्यावर मोठा परिणाम होणार आहे. एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देण्यात येणाऱ्या सरकारी सवलतींची मुदत संपत आहे, तर दुसरीकडे काही सेवांच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळे एकूणच सामान्य नागरिकाच्या खिशाला कोरोना काळात चांगलाच झटका बसण्याची शक्यता आहे. असं असलं तरी या बदलांमध्ये कोरोना काळात बंद झालेल्या काही सेवा सुरु होण्याच्या निर्णयांचा देखील समावेश आहे. त्यामुळे काहीसा दिलासाही मिळणार आहे.

कोरोना काळात कर्जाचे हप्ते भरण्यातील सवलतीची मुदत संपली

भारतीय रिझर्व्ह बँकेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बँकांच्या कर्जाच्या हप्ते भरण्यासाठी 6 महिन्यांची सूट दिली होती. ती सूट 31 ऑगस्टला संपत आहे. त्यामुळे 1 सप्टेंबरपासून कर्जदार नागरिकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कर्जफेडीबाबतच्या सवलतीत मुदतवाढ केल्यास त्याचा परिणाम कर्ज घेणाऱ्यांवर होणार आहे. याआधी आरबीआयने (RBI) कोरोनामुळे व्यवसाय आणि नोकऱ्यांवर विपरीत परिणाम झाल्याने कर्जवसुलीबाबत 1 मार्चपासून 6 महिन्यांसाठी दिलासा दिला होता.

घरगुती गॅसच्या (एलपीजी गॅस) किमतीत वाढ होण्याची शक्यता

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला इंधनाच्या सुधारित किमतींची घोषणा होते. मागील काही काळापासून सातत्याने घरगुती गॅसच्या किमतीत वाढ होत आहे. त्यामुळे 1 सप्टेंबरला देखील पुन्हा एकदा गॅसच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांना याची मानसिक आणि आर्थिक तयारी ठेवावी लागणार आहे.

फास्टटॅग असेल तरच टोलवर सवलत

कोणत्याही ठिकाणावरुन 24 तासामध्ये परत येणाऱ्या वाहनांना फास्टटॅग असेल तरच टोलमध्ये सवलत देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता कोणताही प्रवासी एका ठिकाणावरुन दुसऱ्या ठिकाणी जाताना 24 तासांमध्ये परत फिरणार असेल तर त्याला टोल सवलत मिळवण्यासाठी फास्टटॅग असणं बंधनकारक असणार आहे. रोख टोल भरणाऱ्यांना टोलमध्ये सवलत मिळणार नाही. आतापर्यंत सर्वांनाच ही सवलत मिळत होती.

आधारमधील बदल महागले

यूआयडीएआयने आधारच्या माहितीत कोणतेही बदल करण्यासाठीच्या शुल्कात बदल केले आहे. यानुसार आता नागरिकांना आधारमधील माहितीत कोणताही बदल करायचा असल्यास 100 रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. यात बायोमेट्रिक्स, नाव, जन्मदिनांक अशा गोष्टींचा समावेश आहे. आतापर्यंत या बदलांसाठी 50 रुपये शुल्क आकारले जात होते. आधारमधील बदलांसाठी त्याच्याशी संबंधित वैध कागदपत्रे जमा करणे देखील आवश्यक असणार आहे.

हवाई प्रवास महागणार

1 सप्टेंबरपासून घरगुती आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या खिशाला झळ बसणार आहे. याअंतर्गत प्रवाशांकडून यापुढे सुरक्षा शुल्क आकारले जाणार आहे. घरगुती प्रवासासाठी 150 ऐवजी 160 रुपये आकारले जाणार आहेत. तर आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्यांकडून 4.85 डॉलर ऐवजी 5.2 डॉलर शुल्क आकारले जाईल.

इंडिगोच्या विमानांची टप्प्याने सेवा सुरु

इंडिगोने आपली विमानसेवा टप्प्याटप्प्याने सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 1 सप्टेंबरपासून प्रयागराज, कोलकाता आणि सूरत येथे जाणारी विमानसेवा सुरु होत आहे. भोपाल-लखनौ मार्गावर इंडिगो 180 आसनांचं एअर बस-320 विमान सुरु करणार आहे. ही सेवा आठवड्यातून सोमवार, बुधवार आणि शुक्रवार असे 3 दिवस सुरु असेल.

टोल वाढणार

पुढील महिन्यापासून टोल दरात वाढ होणार आहे. ही टोल वाढ 5 ते 8 टक्क्यांपर्यंत असणार आहे. यानुसार खासगी वाहनं आणि व्यापारी वाहनं यांना वेगवेगळा टोल असणार आहे. याशिवाय सरकार रस्त्यावरील अपघातग्रस्तांना मोफत उपचार देण्याच्या योजनेवरही विचार करत आहे. या योजनेला टोलसोबत जोडल्यास टोलच्या शुल्कात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

GST जमा करण्यात उशिर झाल्यास अतिरिक्त शुल्क

वस्तू आणि सेवा कर देण्यात उशिर झाल्यास 1 सप्टेंबरपासून एकूण देणेदारीवर व्याज लागणार आहे. यावर्षीच्या सुरुवातीला जीएसटी भरण्यात उशिर केल्यामुळे जवळपास 46 हजार कोटी व्याजाची वसूली करण्यावर उद्योग जगतातून काळजी व्यक्त करण्यात आली होती. हे व्याज एकूण देणेदारीवर आकारण्यात आलं होतं.

दिल्लीत मेट्रो सुरु होण्याची शक्यता

राजधानी दिल्लीमध्ये पुन्हा एकदा मेट्रो सुरु होण्याची शक्यता आहे. 1 सप्टेंबरपासून अनलॉक 4.0 मध्ये हे बदल होतील. सुरुवातीला केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच मेट्रो प्रवासाला परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे. तसेच शारीरिक अंतर ठेवण्यासाठी एका कोचमध्ये प्रवाशांची संख्याही कमी ठेवण्यात येणार आहे.

हेही वाचा :

Bank ATM Rules | एटीएम ते मिनिमम बॅलन्स, बँकिंग नियम पूर्वपदावर, ‘हे’ दहा बदल

EMI | ईएमआय आणखी तीन महिने पुढे ढकलण्याची सवलत, रिझर्व्ह बॅंकेचा मोठा दिलासा

Nirmala Sitharaman | आरोग्य, शिक्षण, मनरेगासाठी विशेष तरतुदी, 20 लाख कोटींचे पॅकेज नेमकं कसं?

Big Changes from 1 September amid Corona