महाराष्ट्रात जे घडलं तेच पंजाबमध्ये घडवण्याचा प्रयत्न, कौर यांचा भाजपवर आरोप
महाराष्ट्रात ज्या प्रकारे दोन पक्ष फुटले तसाच काहीसा प्रयत्न पंजाबमध्ये सुरु असल्याचं अकाली दलच्या खासदाराने म्हटलं आहे. त्यांनी भाजपवर आरोप केलाय की, काही नेत्यांना हाताशी धरुन भाजप पंजाबमध्ये देखील अकाल दलात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. पण ते यशस्वी होणार नाहीत.

पंजाबमधील मोठा पक्ष शिरोमणी अकाली दलमध्ये जवळपास ३० वर्षानंतर बंडखोरी होण्याची शक्यता आहे. त्यावरुन अकाली दलच्या खासदार हरसिमरत कौर बादल यांनी भाजपवर मोठा आरोप केला आहे. त्या म्हणाल्या की, महाराष्ट्राप्रमाणे पंजाबमध्ये देखील भाजप कट रचण्याचा प्रयत्न करत आहे. केंद्र सरकार त्यांच्या या मनसुब्यात यशस्वी होणार नाही. संपूर्ण शिरोमणी अकाली दल एकवटला आहे. ते सर्व सुखबीर बादल यांच्या पाठीशी उभे आहेत. शिरोमणी अकाली दल तोडण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे.
अकाल दलमध्ये फूट पडण्याची चिन्ह
हरसिमरत कौर म्हणाल्या की, 117 नेत्यांपैकी फक्त 5 नेते सुखबीर बादलच्या विरोधात आहेत, तर 112 नेते पक्ष आणि सुखबीर बादल यांच्यासोबत उभे आहेत. जे पाच जण विरोधात आहेत ते सर्व भाजपचे आहेत किंवा त्यांच्या संपर्कात आहेत.
अकाली दलाच्या खासदाराने म्हटले की, पाच जणांपैकी एकाने भाजपचा उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढवलीये. दुसऱ्यालाही भाजपने निवडणूक लढवायला लावली, तिसऱ्याचा भाऊ भाजपसोबत आहे आणि चौथ्याचा भाऊ भाजपमध्ये येण्यासाठी फिरत आहे. ते म्हणाले की, हे सर्व भाजपचे कुटील आहेत, जे हे करत आहेत. पंजाबला हे चांगलेच माहीत आहे. संपूर्ण पक्ष सुखबीर सिंग बादल यांच्यासोबत असल्याचे ते म्हणाल्या.
महाराष्ट्रप्रमाणेच पंजाबमध्ये प्रयत्न
महाराष्ट्रात ज्या प्रकारे दोन पक्षात फूट पडली त्या प्रमाणेच पंजाबच्या राजकारणात देखील अशी फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अकाली दलात सध्या बंडखोरीची चिन्ह दिसत आहेत. कारण पक्षातील काही नेत्यांनी सुखबीर सिंग बादल यांचा राजीनामा मागितला आहे. मंगळवारी अकाली दलच्या दोन बैठका झाल्या. एक जालंधरमध्ये जेथे अकाली दलाच्या बंडखोर नेत्यांची बैठक झाली. दुसरी पक्षाच्या काही जिल्ह्यांचे प्रमुखही या बैठकीला उपस्थित होते. दुसरी बैठक पक्षप्रमुख सुखबीर सिंग बादल यांच्या अध्यक्षतेखाली चंदीगडमध्ये झाली. लोकसभा निवडणुकीतील अकाली दलाच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक झाली.
हे पण वाचा आणखी एक मोठा राजकीय भूकंप? शिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता या पक्षात फूट
पक्षाच्या दोन वेगवेगळ्या बैठका
जालंधरमध्ये झालेल्या बैठकीत बंडखोर नेत्यांनी 1 जुलैपासून शिरोमणी अकाली दल बचाओ आंदोलन सुरू करणार असल्याची घोषणा केलीये. या बैठकीत माजी खासदार प्रेमसिंग चंदूमाजरा, माजी एसजीपीसी अध्यक्षा बीबी जागीर कौर, माजी मंत्री परमिंदर सिंह धिंडसा, माजी आमदार सिकंदर सिंह मलुका आणि सुरजित सिंह राखरा यांसारखे मोठे नेते उपस्थित होते.
पक्षप्रमुख सुखबीर सिंग बादल यांनी त्यागाची भावना दाखवावी अशी मागणी त्यांनी केली आहे. चंदीगडमध्ये झालेल्या बैठकीत पक्षप्रमुख सुखबीर सिंग बादल यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करण्यात आला. हे सर्व बंडखोर नेते निराश असून ते भाजप पुरस्कृत असल्याचे अकाली दलाने म्हटले आहे.
