दिवाळीआधी मिश्री बाजार बॉम्बस्फोटाने हादरला, 2 स्कुटींमध्ये स्फोट, काय स्थिती?

Kanpur Blast: कानपूरमधील मेस्टन रोडवरील मिश्री बाजारात एक मोठा स्फोट झाला आहे. दोन स्कूटींमध्ये हा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत चार ते पाच जण जखमी झाले आहेत. यातील 2 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. या स्फोटामुळे बाजारात भीतीचे वातावरण पसरले आहे.

दिवाळीआधी मिश्री बाजार बॉम्बस्फोटाने हादरला, 2 स्कुटींमध्ये स्फोट, काय स्थिती?
Kanpur Blast
| Updated on: Oct 08, 2025 | 9:59 PM

उत्तर प्रदेशातून मोठी बातमी समोर आली आहे. कानपूरमधील मेस्टन रोडवरील मिश्री बाजारात एक मोठा स्फोट झाला आहे. दोन स्कूटींमध्ये हा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत चार ते पाच जण जखमी झाले आहेत. यातील 2 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. या स्फोटामुळे बाजारात भीतीचे वातावरण पसरले आहे. जखमींना तातडीने उर्सुला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि फॉरेन्सिक पथके घटनास्थळावर पोहोचले आहेत. या स्फोटाचे कारण अद्याप समोर आलेले नाही. बुधवारी संध्याकाळी 7.30 वाजताच्या सुमारास हा स्फोट झाला. संध्याकाळची वेळ असल्याने बाजारपेठेत गर्दी होती. त्याचवेळी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन स्कूटरमध्ये स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज सुमारे 500 मीटरपर्यंत ऐकू गेला. यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

मशिदीच्या भिंतींनाही तडे गेले

हा स्फोट इतका शक्तिशाली होता की, यामुळे जवळच्या मरकज मशिदीच्या भिंतींनाही तडे गेले आहेत. या घटनेनंतर पोलीसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले होते. त्यांना चार ते पाच जण जखमी अवस्थेत आढळले. त्यांनी त्यांना तात्काळ उर्सुला रुग्णालयात दाखल केले. पोलीस आयुक्त रघुवीर लाल हे देखील पोलिस पथकासह घटनास्थळी पोहोचले. त्यांच्यासोबत फॉरेन्सिक आणि बॉम्ब पथके होती. दोन्ही पथकांनी घटनास्थळाची तपासणी सुरू केली आहे.

पोलीस आयुक्त रघुवीर लाल यांनी घेतली जखमींची भेट

पोलीस आयुक्त रघुवीर लाल यांनी घटनास्थळी पोहोतच पाहणी केली, त्यानंतर उर्सुला रुग्णालयात जात जखमींची विचारपूस केली. जखमींपैकी दोघांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. इतर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत, सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

स्फोट कशामुळे झाला?

मिश्री बाजारातील हा स्फोट कशामुळे झाला याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिस आयुक्त रघुवीर लाल यांनी यावर भाश्य केले नाही. बॉम्ब पथक आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी पाहणी करत आहे. काही लोक फटाक्यामुळे हा स्फोट झाल्याचे सांगत आहेत. स्कूटरवर फटाके ठेवण्यात आले होते आणि त्यामुळेच स्फोट झाला असं विधान काही लोकांनी केले आहे.