गुगल, मायक्रोसॉफ्टला बाय-बाय, स्वदेशीसाठी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी घेतला मोठा निर्णय!
मंत्री अश्विनी वैष्णव नेहमी स्वदेशीचा प्रचार करताना दिसतात. त्यांनी आता झोहो या मंचाचा जास्तीत जास्त वापर करावा असे आवाहन केले आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडिया खात्यावर याबाबत एक पोस्ट केली आहे.

Ashwini Vaishnav Zoho Use : सध्याच्या बदलत्या जागतिक राजकारणामुळे जगभरातील देश आपापल्या देशात रोजगार, उद्योग यांची भरभराट कशी होईल, यासाठी प्रयत्न करत आहेत. भारतातही आपण आत्मनिर्भर व्हावे यासाठी वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वस्त्रोद्योग, तंत्रज्ञान, विज्ञान अशा वेगवेगळ्या क्षेत्रात स्वदेशी तंत्रज्ञान वापरा असे आवाहन वेळोवेळी केलेले आहे. असे असतानाच आता माहीती आणि तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. कोणतेही प्रझेंटेशन सादर करण्यासाठी परदेशी मंचाचा वापर न करता त्यांनी आता स्वदेशी ‘Zoho’ या प्लॅटफॉर्मचा वापर चालू केला आहे. याबाबत त्यांनी स्वत:च माहिती दिली आहे.
अश्विनी वैष्णव यांच्या ट्विटमध्ये काय आहे?
अश्विनी वैष्णव यांनी एक्स या सोशल मीडिया खात्यावर एक ट्विट पोस्ट केले आहे. या पोस्टमध्ये त्यांनी एक दहा सेकंदांचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये ते एक प्रझेंटेशन सादर करताना दिसत आहेत. पण ते सादर करण्याआधी त्यांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे. तुम्ही पाहात असलेले हे प्रझेंटेशन पूर्णत: स्वेदशी असलेल्या Zoho या मंचावर तयार करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले आहे. स्वदेशीच्या भावनेतून आजचे हे पीपीटी मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंटवर नव्हे तर झोहोच्या मदतीने तयार करण्यात आलेले आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.
Switch to Swadeshi!
Cabinet briefing using Zoho Show. pic.twitter.com/wacKUajwsa
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) September 24, 2025
झोहो नेमके काय आहे?
अश्विनी वैष्णव यांनी आयाधीही Zoho या स्वदेशी मंचाचा वापर करावा, असे आवाहन केले होते. या मंचाच्या मदतीने पीपीटी, डॉक्यूमेंट्स, स्प्रेडशीट्स तसेच इतरही काही कामे करता येतात. 1996 साली श्रीधर वेंबू आणि टॉनी थॉमस यांनी या मंचाची स्थापना केली होती. झोहो कॉर्पोरेशन ही एक सॉफ्टवेअर सर्व्हिस कंपनी असून तिचे मुख्यालय चेन्नईत आहे. ही कंपनी क्लाऊड बेस टुल पुरवते. Zoho रायटर, Zoho सिट, Zoho शो, Zoho नोटबूक, Zoho वर्कड्राईव्ह, Zoho मेल, Zoho मिटिंग, Zoho कॅलेंडर अशा अनेक सेवा या कंपनीकडून दिल्या जातात.
