भारत जगातील 7वा जलवायू प्रभावित देश, सातत्याने येणाऱ्या जलप्रलयाचे कारण काय?
पर्यावरण थिंक टँक जर्मनवॉचद्वारे प्रकाशित ग्लोबल क्लायमेट रिस्क इंडेक्स 2021 नुसार भारत जगातील सातवा सर्वाधिक जलवायु प्रभावित देश आहे.

मुंबई : उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर तिथे बचावकार्य सुरु आहे. आतापर्यंत 18 जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. मात्र, अद्याप 202 लोक बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. अशावेळी भारतात सातत्याने असे जलप्रलय का होत आहेत? असा प्रश्न विचारला जात आहे. उत्तराखंडमधील केदारनाथनंतर जोशीमठ दुर्घटनेमुळं (Chamoli Glacier Burst) पुन्हा एकदा जलवायु परिवर्तनाकडे सर्वांचं लक्ष वेधलं आहे. पर्यावरण थिंक टँक जर्मनवॉचद्वारे प्रकाशित ग्लोबल क्लायमेट रिस्क इंडेक्स 2021 नुसार भारत जगातील सातवा सर्वाधिक जलवायु प्रभावित देश आहे. या इंडेक्सनुसार सर्वाधिक प्रभावित देशांच्या यादीत भारताआधी मोजाम्बिक, झिंम्बॉम्बे, बहामा, जपान, मलावी आणि अफगाणीस्तारचा क्रमांक येतो.(Climate change in India increases natural disasters)
जलवायु संबंधित घटना आणि दुर्घटनांच्या आधारे देशांचं विश्लेषण करुन ग्लोबल क्लायमेट रिस्क इंडेक्स रिपोर्ट तयार करण्यात आली आहे. त्याद्वारे देशांना रँकिंग देण्यात आलं आहे. या रिपोर्टमध्ये 2000 ते 2019 पर्यंतची आकडेवारी आहे. नेदरलँडद्वारे आयोजित करण्यात आलेल्या ग्लोबल क्लायमेट अडाप्टेशन समिटमध्ये पहिल्यांदा हा रिपोर्ट प्रकाशित करण्यात आला होता.
20 वर्षात 11 हजारापेक्षा अधिक दुर्घटना
या रिपोर्टनुसार 2000 ते 2019 दरम्यान जलवायू परिवर्तनामुळे सर्वाधिक प्रभावित 10 देशांच्या यादीत 8 देश हे विकसनशील देश आहेत. या रिपोर्टनुसार विकसनशील देशात राहणाऱ्या लोकांना महापूर, चक्रीवादळ आणि उष्णतेच्या लाटेसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे सर्वाधिक नुकसान होतं. 2000 ते 2019 दरम्यान 11 हजाराहून अधिक नैसर्गिक आपत्ती आल्या. त्यामुळे 4.75 लाखापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालाय. तसंच अंदाजे 2.56 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. 2019 मध्ये 10 सर्वाधिक प्रभावित देशांमध्ये 6 उष्णकटिबंधीय चक्रीवादळाच्या कचाट्यात सापडले.
2019 मध्ये भारतात मान्सूनचा कालावधी जास्त
2019 मध्ये भारतात मान्सून जवळपास 1 महिना अधिक थांबला. जून ते सप्टेंबरदरम्यान 110 टक्के जास्त पाऊस पडला. जो 1994 पेक्षाही जास्त होता. महापुरामुळे भारताच्या 14 राज्यांमध्ये जवळपास 1 हजार 800 जणांचा मृत्यू झाला तर 18 लाख लोकांचं पुनर्वसन करावं लागलं. जवळपास 1 हजार कोटी डॉलरचं आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
भारतात सर्वाधिक लोक शेतीवर अवलंबून आहेत. मान्सूनमध्ये होत असलेल्या बदलांमुळे भारतातील अनेक शहरं बुडाली आहेत. असं जलवायु परिवर्तनावर काम करणारी वेबसाईट carboncopy.info च्या रिपोर्टमध्ये भारती इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक पॉलिसीचे प्रध्यापक अंजल प्रकाश यांनी म्हटलंय.
जलवायू परिवर्तनावर ठोस उपाय गरजेचे
जर्मनवॉच च्या रिपोर्टमध्ये जलवायू परिवर्तनामुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचण्यासाठी आणि जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी चांगले उपाय आणि रणनिती आखण्याची गरज आहे. धोक्याच्या परिस्थितीत जागरुकता आणि तयारी लोकांना अधिक सक्षम बनवू शकेल. अशा प्रकारात बांग्लादेश हे अधिक चांगलं उदाहरण आहे. बांग्लादेशच्या समुद्र किनाऱ्यावर सर्वाधिक चक्रीवादळं धडकतात. पण पुर्वानुमान, सूचना, दूरसंचार प्रणाली, लोकांना वाचवण्यासाठीच्या उपाययोजनांमुळे लोकांच्या मृत्यूच्या प्रमाणात गेल्या 40 वर्षात 100 टक्क्यांहून अधिक सुधारणा झाली आहे.
संबंधित बातम्या :
मृत्यू थयथय समोर नाचत होता आणि हातात फक्त फोन, 300 मीटर बोगद्यात अडकलेल्यांची हादरवणारी कहाणी
Photos : देवभूमी उत्तराखंडमध्ये पुन्हा हाहा:कार, एक एक फोटो सांगतोय जीवन-मरणाची कसोटी
Climate change in India increases natural disasters
