मोठी बातमी! काँग्रेसला धक्का, ‘या’ बड्या नेत्याने आपल्या पदाचा दिला राजीनामा

काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी आज (10 ऑगस्ट) पक्षाच्या परराष्ट्र व्यवहार विभागाच्या (DFC) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

मोठी बातमी! काँग्रेसला धक्का, या बड्या नेत्याने आपल्या पदाचा दिला राजीनामा
Rahul Gandhi
| Updated on: Aug 10, 2025 | 10:59 PM

काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी आज (10 ऑगस्ट) पक्षाच्या परराष्ट्र व्यवहार विभागाच्या (DFC) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आनंद शर्मा यांनी पक्षाची पुनर्रचना व्हावी आणि त्यात तरुण नेत्यांचा समावेश व्हावा यासाठी पद सोडत असल्याचे म्हटले आहे. माजी केंद्रीय मंत्री राहिलेले शर्मा एका दशकापासून या पदावर काम करत होते. मात्र आता त्यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पक्षाला आता या पदासाठी नवा नेता शोधावा लागणार आहे.

आनंद शर्मा यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना राजीनाम्याचे पत्र लिहिले आहे. यात आनंद शर्मा यांनी म्हटले की, ‘मी काँग्रेस पक्ष आणि पक्षाध्यक्ष दोघांनाही आधी सांगितले आहे की, माझ्या मते समितीची पुनर्रचना करावी जेणेकरून चांगली क्षमता असलेल्या तरुण नेत्यांना त्यात समाविष्ट करता येईल. यामुळे समितीच्या कामकाजात सातत्य राहील. पुढे लिहिताना शर्मा यांनी पक्ष नेतृत्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

काँग्रेसचे परराष्ट्र संबंध मजबूत करण्यात महत्वाची भूमिका

आनंद शर्मा यांनी पुढे आपल्या पत्रात म्हटले की, गेल्या काही दशकांमध्ये समितीने आशिया, आफ्रिका, मध्य पूर्व, युरोप आणि लॅटिन अमेरिकेतील प्रमुख राजकीय पक्षांसोबत काँग्रेसचे संबंध मजबूत केले आहेत. परराष्ट्र व्यवहार विभागाने काँग्रेस विचारसरणीचे राजकीय पक्ष आणि आंतरराष्ट्रीय संघटनांसोबत चांगले संबंध प्रस्थापित केले आहेत. याचा मोठा फायदा पक्षाला झाला आहे.

काँग्रेसचा मुख्य चेहरा

ज्येष्ठ नेते आनंद शर्मा हे काँग्रेस कार्यकारिणी समिती (सीडब्ल्यूसी) चे सदस्य आहेत. ही पक्षाची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था आहे. तसेच शर्मा हे जवळजवळ चार दशकांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर काँग्रेसचे प्रतिनिधित्व करत आहेत. अलिकडेच ऑपरेशन सिंदूर नंतर भारताची भूमिका मांडण्यासाठी परदेशात गेलेल्या सर्वपक्षीय संसदीय शिष्टमंडळांचे ते सदस्य देखील होते.

आनंद शर्मा यांनी भारत-अमेरिका यांच्यातील अणु कराराच्या वाटाघाटींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांनी अणु पुरवठादार गट (NSG) मध्ये भारताला सूट मिळावी यासाठी प्रयत्न केले होते. तसेच त्यांनी पहिले भारत-आफ्रिका शिखर परिषदेचे आयोजन केले होते. ते देशाचे वाणिज्य मंत् देखील होते. त्यांच्या कार्यकाळात पहिला जागतिक व्यापार संघटनेचा करार आणि व्यापक व्यापार करार झाला होता. आता त्यांनी काँग्रेसमधील आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याने पक्षाला मोठा धक्का बसला आहे.