Congress Leader Beaten : गळा पकडून दे दणादण, काँग्रेस नेत्याला तुफान चोपलं, भर कार्यक्रमात नेमकं काय घडलं?
निवडणुकीदरम्यान एका काँग्रेस नेत्याला मारहाण झाली आहे. हे सगळं प्रकरण तिकीट वाटपाच्या गोंधळावरुन झालं असल्याचं सांगितलं जात आहे. ज्यांना तिकीट दिलं नाही अशा नाराज कार्यकर्त्यांनी या नेत्यासोबत धक्काबुक्की केली. पोलिसांनी याप्रकरणात चार आरोपींना अटक केली आहे. दरम्यान मुख्य आरोपी अद्याप फरार आहे.

Congress Leader News : संबंधित घटना राजस्थानमधील बीकानेरमधली आहे. शहर काँग्रेस जिल्हाअध्यक्ष मदन गोपाल मेघवाल यांच्या निवडणूक प्रचाराच्या कार्यक्रमातहा सर्व प्रकार घडला आहे. पालिका निवडणुकीचे तिकीट न मिळाल्याने नाराज असलेल्या एका कार्यकर्त्याने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. पोलिसांनी याप्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक केली आहे.
कशी घडली घटना?
काँग्रेसने वॉर्ड क्रमांक 50मध्ये कार्यालयाचे उद्घाटन ठेवले होते. त्यावेळी काँग्रेसकडून उमेदवारीची आशा बाळगून असलेले दावेदार मोहित अरोरा आणि त्यांच्या साथीदारांनी मदन गोपाल मेघवाल यांना ढकलून मारहाण केली असल्याचे वृत्त समोर आले आहे.
दरम्यान, यासर्व मारहाणीच्या गोंधळामध्ये जिल्हाध्यक्षांचे कपडे फाटले आणि त्यांना किरकोळ दुखापतही झाली आहे. यासर्वप्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर आता या सर्व प्रकरणाची दखल काँग्रेसने घेतली आणि संबंधितांवर मोठी कारवाई केली आहे. पक्षाकडून आरोपी दीपक अरोरा आणि त्यांचे चिरंजीव मोहित अरोरा या दोघांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबीत करण्याचा निर्णय घेतला आहे.
नियोजन करुन केला हल्ला
दरम्यान या सर्व घटनेचा वृत्तांत शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मदन गोपाल मेघवाल यांनी सांगितला आहे. ते म्हणाले की, “हा सर्व एक पूर्वनियोजित कट होता. आरोपींनी या हल्ल्याची पूर्वतयारी केली होती. त्यामुळे त्यांनी या घटनेचा व्हिडिओही तयार केला. मोहित अरोरा चार-पाच जणांना घेऊन मला बाजूला घेऊन जात बोलायची इच्छा व्यक्त केली पण त्याचा हेतू माझ्यावर हल्ला करायचा होता.”
“मी गाडी बाजूला घेताच त्याच्या सहकाऱ्याने मला चापट मारली. त्यांना उमेदवारीवर चर्चाच करायची नव्हती. माझ्यासोबत कोणीही नव्हतं, माझे समर्थक आणि कार्यकर्ते येण्याआधीच मोहित आणि त्याचा सहकाऱ्यांनी घटनास्थळावरुन पळ काढला”, असं मेघवाल पुढे म्हणाले.
महापौरांचं आगमन आणि धरणे आंदोलन
दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणात जेएनव्हीसी पोलीस स्टेशनमध्ये मोहित अरोरा आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल केला. तात्काळ कारवाई करत चौघांना अटकही केली. पण मुख्य आरोपी मोहित हा अद्यापपर्यंत फरार आहे. त्यानेच हा मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल केला असल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान, आता काँग्रेस नेते विष्णू राम सियाग आणि जिल्हाध्यक्ष मदन गोपाल यांच्यासह पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी आरोपीला तात्काळ अटक करण्यासाठी पोलिस स्टेशनबाहेरच धरणे आंदोलन केले.
