“E20 नव्हे 420 इंधन..” राहुल गांधी यांची ऐन दिवाळीत आरोपांची लड, काय फोडला बॉम्ब?
Rahul Gandhi E20 Ethanol: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सुद्धा इथेनॉल मिश्रीत पेट्रोलवरून सरकारवर हल्लाबोल चढवला आहे. कर्नाटकातील विविध जिल्ह्यांमधून गोळा केलेल्या नमुन्यांआधारे त्यांनी केंद्र सरकारविरोधात आरोपांची लड लावली.

Rahul Gandhi E20 Ethanol: देशात पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण करण्याच्या धोरणाविरोधात आता लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जोरदार मोर्चा उघडला आहे. नागरिकांनी अगोदरच ई-20 विरोधात नाराजीचा सूर आळवला आहे. एका निर्णयामुळे नागरिकांवर मोठा आर्थिक भार पडला आहे. एकतर त्यांच्या वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे, तर दुसरीकडे साखर महागली आहे, असा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे. एसआयआर, ज्ञानेश कुमार, एफस्टीन फाईल्सनंतर आता राहुल गांधी यांनी ई-20 पेट्रोलवरून सरकारवर आरोपांची राळ उडवून दिली आहे.
ई-20 नव्हे तर भेसळयुक्त पेट्रोल
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केला आहे. E-20 पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल तर 80 टक्के पेट्रोलचा दावा करण्यात येत आहे. त्यावरून राहुल गांधी यांनी काही पुरव्यांसह मोठा आरोप केला आहे. E-20 पेट्रोल 420 इंधन असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सामान्य जनतेच्या वाहनांमध्ये सरकारच पेट्रोलची चोरी करत असल्याचा धक्कादायक आरोप त्यांनी केला. त्यांनी कर्नाटकातून समोर आलेल्या काही लॅब रिपोर्टचा दाखला देत सरकारला जाब विचारला आहे.
कर्नाटकातील इंधनाचा लॅब रिपोर्ट काय?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. कर्नाटकातील विविध जिल्ह्यांमधून पेट्रोलचे 14 नमुन्यांपैकी 11 नमुन्यांमध्ये 20 टक्क्यांपेक्षा जास्त इथेनॉलचे प्रमाण आढळले आहे. यामध्ये इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम, नायरा आणि शेल सारख्या कंपन्यांच्या पेट्रोल नमुन्यांचा समावेश असल्याचा काँग्रेसचा दावा आहे. काही नमुन्यांमध्ये इथेनॉलचे प्रमाण 30 टक्क्यांपेक्षा अधिक आढळल्याने खळबळ उडाली आहे. सरकारी कंपन्यांच देशातील नागरिकांना फसवत असल्याचा आरोप आता होत आहे.
राहुल गांधींचा मोदींना थेट सवाल
हा प्रकार समोर आल्यानंतर राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट सवाल केला आहे. देशात पुरवल्या जाणाऱ्या पेट्रोलमधील प्रत्यक्ष इथेनॉलच्या प्रमाणावर सरकारचे किती नियंत्रण आहे? असा सवाल त्यांनी विचारला. निश्चित मात्रेपेक्षा अधिक इथेनॉल मिसळणाऱ्या तेल कंपन्यांवर कधी आणि काय कारवाई करणार, असा थेट सवालही राहुल गांधी यांनी विचारला आहे.
वाहनांचे मोठे नुकसान, नागरिकांच्या खिशावर भार
20 टक्के या निश्चित मर्यादेपेक्षा पेट्रोलियम कंपन्या पेट्रोलमध्ये अधिक प्रमाणात इथेनॉल टाकत असल्याचे समोर आले आहे. यापूर्वी सुद्धा नागरिकांनी ई-20 पेट्रोलमुळे दुचाकी, चारचाकीचे इंजिन, काही पार्ट्स खराब होत असल्याचा दावा केला आहे. तर सरकारने सुद्धा काही पार्ट्स खराब होत असल्याचे मान्य केले आहे. जास्त इथेनॉलमुले मायलेज घसरते. वाहनांच्या देखभालीचा खर्चही वाढतो. पेट्रोल पंपावर याविषयीची कोणतीची स्पष्टता नसल्याने नागरिकांची मोठी फसवणूक होत आहे. त्यांना दुहेरी मार सहन करावा लागत आहे. इंधनाचे प्रयोग थेट ग्राहकांवरच करण्यात येत असल्याने देशातील नागरीक मेटाकुटीला आला आहे .
