अभिजीत दिपकेंच्या आंदोलनाआधी मोठी अपडेट! तिरंगा मोर्चासाठी ठरलेलं ठिकाण दिल्ली प्रशासनानं बंद केलं; राजधानीत काय घडतंय?
Delhi Central Park News: राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिल्लीतील कनॉट प्लेस येथील सेंट्रल पार्क १६ आणि १७ ऑक्टोबर रोजी लोकांसाठी बंद ठेवण्याची नोटीस जारी केली आहे.

कॉकरोच जनता पक्षाचे प्रमुख अभिजीत दीपके यांनी पुन्हा एकदा दिल्लीत आंदोलनाची घोषणा केली आहे. त्यांनी एक व्हिडिओ संदेश जारी करून लोकांना शुक्रवार, १६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता तिरंगा घेऊन कनॉट प्लेस येथील सेंट्रल पार्कमध्ये येण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी या आंदोलनाला ‘लेहरा दो तिरंगा’ असे नाव दिले आहे. मात्र या आंदोलनापूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे. यामुळे आता अभिजीत दिपकेंना मोठा धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या कनॉट प्लेसमधील सेंट्रल पार्क १६ आणि १७ ऑक्टोबर रोजी लोकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. एनडीएमसीने प्रशासकीय कारणांचा हवाला देत ही सूचना जारी केली आहे. सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी उद्या, १६ तारखेला ‘लेहरा दो तिरंगा’ कार्यक्रमाची घोषणा केली आहे. त्यांनी लोकांना त्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. आम आदमी पक्षानेही या कार्यक्रमात सहभागी होण्याची घोषणा केली आहे.
सीजेपीचे सह-संयोजक सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर अभिजीत दीपके यांनी या कार्यक्रमाची घोषणा केली होती. जंतर मंतर येथे अनधिकृतपणे प्रवेश करणे, जामिनाच्या अटींचे उल्लंघन करणे आणि कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या कामात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली दोघांना अटक करण्यात आली होती. ते सध्या तिहार तुरुंगात आहेत.
दिल्ली पोलिसांनी सांगितले की, कनॉट प्लेस परिसरात बीएनएसएसचे कलम १६३ लागू आहे. प्रशासकीय कारणांमुळे सेंट्रल पार्क १६ आणि १७ ऑक्टोबर रोजी बंद राहील, अशी माहिती एनडीएमसीने त्यांना पत्राद्वारे दिली आहे. एनडीएमसीने दिल्ली पोलिसांना या महत्त्वाच्या आणि संवेदनशील सार्वजनिक उद्यानात योग्य सुरक्षा व्यवस्था सुनिश्चित करण्याची आणि अनधिकृत व्यक्तींना उद्यानात प्रवेश करण्यापासून रोखण्याची विनंती देखील केली आहे.
दिल्ली पोलिसांनी जनतेला आवाहन केले आहे की, कलम १६३ अंतर्गत लागू केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या गर्दीत एकत्र येऊ नये. योग्य ठिकाणी ११ जणांच्या गटाला राष्ट्रध्वज घेऊन राष्ट्रगीत गाण्याची परवानगी देण्याची व्यवस्था केली जाऊ शकते. कलम १६३ चे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.
