Delhi Blast : दिल्लीतील स्फोट नेमका कसा झाला? FSL रिपोर्ट देणार प्रत्येक प्रश्नाचं उत्तर, काय असतं त्यात?
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळच्या कार स्फोटात ९ जण मृत्युमुखी पडले, तर ३० हून अधिक जखमी झाले. दिल्ली पोलीस व केंद्रीय यंत्रणा युद्धपातळीवर तपास करत असून १३ संशयितांना ताब्यात घेतले आहे.

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला तर ३० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. या बॉम्बस्फोटाच्या तपासासाठी दिल्ली पोलीस आणि केंद्रीय तपास यंत्रणेकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. याप्रकरणी १३ संशयित व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यात आता लवकरच या बॉम्ब स्फोटाच्या तपासात आज मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटासंदर्भात फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FSL) चा पहिला अहवाल आज सादर होणार आहे. त्यामुळे यात हा अपघात नेमका कसा झाला, याबद्दलची सर्व माहिती समोर येणार आहे.
दिल्लीतील या स्फोटासंदर्भात दिल्ली पोलिसांनी यूएपीए (UAPA), एक्सप्लोसिव्ह ॲक्ट आणि भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणातील महत्त्वाचा दुवा असलेला फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FSL) चा प्राथमिक अहवाल आज दुपारपर्यंत दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलकडे सुपूर्द केला जाईल अशी अपेक्षा आहे. या अहवालामुळे घटनास्थळी सापडलेल्या स्फोटक सामग्रीचे स्वरूप आणि रासायनिक रचना याबद्दल स्पष्ट माहिती मिळण्यास मदत होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरुन अमोनियम नायट्रेटचे (Ammonium Nitrate) अंश सापडले असावेत, पण स्फोटकाचे नेमके स्वरूप FSL अहवालातून निश्चित होईल. घटनास्थळावरून गोळा केलेले स्फोटकांचे अंश आणि इतर भौतिक पुराव्यांचे सखोल विश्लेषण FSL मध्येअसेल.
FSL अहवाल म्हणजे काय?
FSL चे पूर्ण रूप आहे फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (Forensic Science Laboratory) म्हणजेच न्यायिक विज्ञान प्रयोगशाळा असते. FSL ही एक सरकारी संस्था आहे, जी गुन्हेगारी घटनांशी संबंधित भौतिक पुराव्यांची (Physical Evidence) वैज्ञानिक तपासणी करते. स्फोट, खून, बलात्कार, अंमली पदार्थांचे गुन्हे (NDPS) अशा गंभीर प्रकरणांमध्ये तपास यंत्रणांना घटनास्थळावरून रक्त, केस, कपड्यांचे तुकडे, स्फोटकांचे अंश किंवा इतर कोणताही भौतिक पुरावा मिळतो. या पुराव्यांची सखोल वैज्ञानिक तपासणी FSL मध्ये केली जाते आणि या तपासणीवर आधारित जो अहवाल तयार केला जातो, त्याला FSL रिपोर्ट म्हणतात.
हा अहवाल न्यायालयात वैज्ञानिक पुरावा म्हणून सादर केला जातो. यात गुन्ह्याचे कारण गुन्ह्यात वापरलेला पदार्थ, स्फोटकांचा प्रकार आणि आरोपींचा सहभाग निश्चित करण्यासाठी FSL अहवाल अत्यंत महत्त्वाचा असतो. दिल्ली स्फोटाच्या प्रकरणात हा अहवाल स्फोटकांचे स्वरूप स्पष्ट करून तपासाला निर्णायक दिशा देणार आहे. दरम्यान अद्याप हा रिपोर्ट आलेला नाही.
