
Trump Tariffs : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गेल्या वर्षी दुसऱ्यांदा सत्तारूढ झाले आणि तेव्हापासून त्यांनी जगाला हादरवणारे असे निर्णय एकामागोमाग घ्यायला सुरूवात केली. भारतावर तर त्यांची वक्र दृष्टि जास्तच पडली. कारण रशियाकडून तेल खरेदी करण्याच्या भारताच्या निर्णयाचा राग त्यांनी टॅरिफ लावून काढला. भारतावर ट्रम्प यांनी चक्क 50 टक्के टॅरिफ लादला. हे शुल्क दोन टप्प्यात लागू करण्यात आले होते आणि ते 50 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. अमेरिकेच्या या निर्णयामुळे रत्ने आणि दागिन्यांपासून ते इलेक्ट्रॉनिक्स आणि यंत्रसामग्रीपर्यंत अनेक भारतीय उद्योगांवर गंभीर परिणाम झाला आहे. ट्रम्प यांनी आततायी निर्णय घेत लादलेल्या टॅरिफमध्ये कोणत्या भारतीय उत्पादनांचा समावेश आहे ते जाणून घेऊया.
काही महिन्यांपूर्वीच हा निर्णय जाहीर करण्यात आला. ट्रम्प प्रशासनाने हे शुल्क दोन टप्प्यात लागू केले. एप्रिल 2025 मध्ये भारतीय आयातीवर 25% टॅरिफ लादण्यात आला. मात्र दोन महिन्यांपूर्वीच, म्हणजेच ऑगस्ट 2025 मध्ये भरताची रशियाकडून तेल आयात सुरू राहिल्यामुळे भडकलेल्या ट्रम्प यांनी आणखी 25% दंड जोडला. त्यामुळेच भारतावर आता एकूण टॅरिफ हा 50 % इतका आहे.
रशियावर जागतिक निर्बंध असूनही भारताने रशियन तेल आणि संरक्षण उपकरणे खरेदी करणे हेच या टॅरिफचे मुख्य कारण आहे. असा व्यापार हा अप्रत्यक्षपणे युक्रेनमधील संघर्षाला चालना देत आहे असं अमेरिकेचं म्हणणं आहे. भारताने रशियाकडून तेलखरेदी थांबवावी अशी त्यांची मागणी आहे, पण भारताने अमेरिकेसमोर झुकण्यास नकार दिला आहे.
कोणत्या भारतीय उत्पादनांवर टॅरिफ ?
अमेरिकेने लावलेल्या या टॅरिफचा भारतीय निर्यातीवर, विशेषतः अमेरिकन बाजारपेठेवर अवलंबून असलेल्या उद्योगांवर लक्षणीय परिणाम झाला आहे. रत्ने आणि दागिने, कापड, फर्निचर आणि ऑटो कंपोनेंट यासारख्या क्षेत्रांमध्ये मागणीत घट तर झालीच आहे पण व्यापार संबंधही ताणले जात आहेत.
या टॅरिफमध्ये औद्योगिक ते ग्राहकोपयोगी उत्पादनांपर्यंत, उदाहरणार्थ – रत्ने आणि दागिने, चामड्याची उत्पादने, पादत्राणे, इलेक्ट्रॉनिक्स, फर्निचर, यंत्रसामग्री, कृषी उत्पादने आणि सागरी उत्पादने अशा विस्तृत श्रेणीचा समावेश आहे.
सागरी उत्पादनांमध्ये, भारतीय कोळंबीच्या निर्यातीवर लक्षणीय परिणाम झाला आहे, तर कृषी उत्पादनांमध्ये, तांदूळ, मसाले आणि चहावर मोठा परिणाम झाल्याचे दिसून आले आहे.
असं असलं तरीही सर्व भारतीय निर्यातीवर परिणाम झालेवा नाही. ट्रम्प प्रशासनाने काही आवश्यक आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या वस्तू, उदाहरणार्थ – औषधे, सेमीकंडक्टर, कच्चे तेल, नैसर्गिक वायू आणि काही आवश्यक खनिजे, यांना टॅरिफमधून सूट दिली आहे.
ट्रम्प प्रशासनाच्या या टॅरिफचा परिणाम केवळ व्यापारावरच नाही तर दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांवरही होत आहे. भारत इतर देशांशी संबंध मजबूत करून आणि मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन देऊन यात संतुलन साधण्याचा प्रयत्न करू शकतो.