‘दिग्विजय यांच्या काळात रस्ते ओम पुरीसारखे, आमच्या वेळी श्रीदेवी सारखे…भाजपा आमदाराची मुक्ताफळे
एकेकाळी बिहार येथील रस्त्यांना आरजेडीचे नेते लालू प्रसाद यादव यांनी अभिनेत्री हेमामालिनीच्या गालांशी तुलना केल्याने अडचणीत आले होते. आता मध्य प्रदेशातील भाजपा आमदाराने त्यावर कडी केली आहे.

मध्य प्रदेशातील विधान सभेच्या मान्सूनसत्राच्या पहिल्याच दिवशी भाजपाचे आमदार प्रीतम लोधी आपल्या एका वक्तव्याने वादात सापडले आहेत. जोरदार पाऊस आणि रस्त्यांतील खाचखळगे पार करीत ते ओला टॅक्सीने विधानसभेत पोहचले तेव्हा त्यांनी रस्त्यांची तुलना बॉलीवूड अभिनेता आणि अभिनेत्रींशी केली. त्यावर विरोधी पक्षाने जोरदार आक्षेप घेतला. एका प्रश्नाचे उत्तर देताना भाजपाचे आमदार प्रीतम लोधी म्हणाले की “दिग्विजय यांच्या काळात मध्यप्रदेशचे रस्ते ओम पुरी सारखे होते, आमच्या वेळी श्रीदेवी सारखे आहेत.”
शिवपुरी जिल्ह्यातील पिछोर विधानसभा मतदार संघातील भाजपा आमदार प्रीतम लोधी ओला टॅक्सीतून बसून सोमवारी मध्य प्रदेशच्या विधानसभेत पोहचले. जेव्हा मीडियाने टॅक्सीतून येण्याचे कारण विचारले तर प्रीतम आमदार लोधी हसत म्हणाले की, ‘पाऊस खूप पडत आहे. इंद्र भगवान नाराज आहेत. रस्ते वॉटप पार्क बनले आहेत. नाव नव्हती म्हणून ओला टॅक्सीने यावे लागले.’
जरा जास्तच पाऊस पडत – आमदार लोधी
यावेळी मीडिया प्रतिनिधींनी मध्य प्रदेशातील खराब रस्त्याबाबत भाजपा आमदार प्रीतम लोधी यांना विचारणा केली तेव्हा त्यांनी प्रदेशातील रस्त्याची तुलना बॉलीवूड अभिनेता आणि अभिनेत्रीशी केली. ते म्हणाले की, ‘दिग्विजय सिंह यांच्या वेळी रस्ते ओमपुरी सारखे होते. परंतू आता आमच्या वेळी श्रीदेवी सारखे आहेत. सध्या जास्त पाऊस कोसळत आहे. यामुळे पाणी साचत आहे. काही दिवसांत सर्व सामान्य होईल.’
भाजपा आमदाराचे उत्तर बेजबाबदार – काँग्रेस
विरोधी पक्ष काँग्रेसने भाजपा आमदार प्रीतम लोधी यांच्या या वक्तव्याला आक्षेप घेत बेजबाबदार वक्तव्य म्हटले आहे. काँग्रेस आमदार आणि माजी मंत्री सचिन यादव म्हणाले की मध्य प्रदेशातील रस्ते खड्ड्यात गेले आहेत. ग्वाल्हैर आणि भोपाळ सारख्या जागेतील रस्ते खचले आहेत अशात सरकारचे आमदार रस्त्याची तुलना चित्रपट अभिनेते आणि अभिनेत्रींशी करीत आहे. हे जनतेच्या व्यथेवर हसण्यासारखे आहे. जनतेची मस्करी करण्यासारखे आहे.
भोपालमध्ये जोरदार पाऊस
मध्य प्रदेशात जोरदार पाऊस होत आहे. राजधानी भोपाळमध्ये सोमवारी सकाळपासून जोरदार पर्जन्यवृष्टी सुरु आहे. शिवपुरी,बैतूल, विदिशा, छिंदवाडा आणि श्योपुर सह अनेक जिल्ह्यांना याचा फटका बसला आहे. हवामान विभागाने अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त केलेला आहे. मध्य प्रदेशातील आठ जिल्हे ग्वाल्हैर, शिवपुरी, गुना, दतिया, अशोकनगर, भिंड, मुरैना आणि श्योपुर मध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
