भरधाव कार चालवताना नाकात चिप्स अडकले, कार पलटली आणि… महाविचित्र अपघातात काय घडलं?
जयपूरजवळील एका रस्ते अपघातात चिप्सचा तुकडा जीवघेणा ठरला. कार चालक महेश सैनी यांच्या नाकात चिप्सचा तुकडा अडकल्याने त्यांनी कारवरील नियंत्रण गमावलं. या अपघातात त्यांची पत्नी पारूल सैनी यांचा मृत्यू झाला, तर महेश गंभीर जखमी झाले.

एका रस्ते अपघातात चिप्सचा एक तुकडा मृत्यूचं कारण ठरला आहे. कार चालक तरुणाच्या नाकात चिप्सचा तुकडा अचानक अडकला. त्यामुळे तो घाबरला आणि त्याचं कारवरील नियंत्रण सुटलं. त्यामुळे त्याची कार हायवेवरच पलटली. या दुर्घटनेत त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. तर तो स्वत: गंभीर जखमी झाला आहे. या विचित्र घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
आज सकाळी 7.30 वाजता ही दुर्घटना घडली. दौसा जिल्ह्यातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला. जयपूरच्या आदर्श बस्ती टोंक फाटक येथील रहिवाशी महेश सैनी आणि त्याची पत्नी पारूल सैनी हे प्रयागराजला महाकुंभमध्ये सामील होण्यासाठी निघाले होते. प्रवास लांबचा होता, त्यामुळे दोघेही कारमध्ये बसून चिप्स खात होते. त्यावेळी अचानक एका चिप्सचा तुकडा या युवकाच्या नाकात फसला. त्यामुळे तो प्रचंड घाबरला.
हा अपघात महाभयंकर
महेशने घाबरून नाकातून चिप्स काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हायवेवर आहोत याचं त्याला भान राहिलं नाही. त्याचं कारवरून लक्ष विचलित झालं. अचानक त्याचं कारवरील नियंत्रण सुटलं. त्यामुळे प्रचंड वेगात असलेली कार अनियंत्रित झाल्याने पाहता पाहता रस्त्यावर पलटी झाली. हा अपघात महाभयंकर होता. कार पलटी होण्याचा आवाज दूरपर्यंत आला. कार पलटी झाल्याचा आवाज येताच गावकरी धावले. त्यांनी तात्काळ पोलिसांना याबाबतची माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी येऊन दोघांनाही कारच्या बाहेर काढलं. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचार सुरू असतानाच त्याची पत्नी पारूल हिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. तर महेशला उपचारासाठी अॅडमिट करून घेतलं आहे. त्याच्यावर उपचार सुरू असून तोही गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांनी महेशच्या कुटुंबाला या अपघाताची माहितीही दिली आहे.
अशा परिस्थिती सावध राहा
या अपघाताने पुन्हा एकदा वाहन चालकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. गाडी चालवताना खाणंपिणं टाळलं पाहिजे. मोबाईलचा वापर करता कामा नये. एक छोटीशी चुकी सुद्धा तुमच्या जीवावर बेतू शकते. तर रस्ते नियमांचं पालन करणं आवश्यक असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. वाहन चालवताना सतर्क राहिलं पाहिजे. कोणत्याही प्रकारचं लक्ष विचलित करणारं काम गाडी चालवताना करू नये. एक छोटीशी चूकही जीव घेऊ शकते हेच या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केलंय.