विमानतळावर अचानक आगीचा भडका, प्रचंड तारांबळ, कोलाकाता एअरपोर्टवर नेमकं काय घडलं?
कोलकाता विमानतळावर बुधवारी रात्री अचानक आगीचा भडका उडाला. त्यामुळे प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. आगीचा भडका उडाल्यानंतर प्रवाशांची पळापळ झाली. यावेळी विमानतळावरील सुरक्षा यंत्रणांनी देखील महत्त्वाची भूमिका निभावली.

कोलकाता : विमानतळावर रात्री 9 वाजेची वेळ होती. प्रवाशांची वर्दळ होती. काही प्रवाशी विदेशात जाण्यासाठी निघाले होते. तर काही देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये जाण्यासाठी निघाले होते. काहीजण विमान प्रवास करुन विमानतळावर दाखल झाले होते. ते आपापल्या घरी किंवा त्यांनी बुक केलेल्या हॉटेलमध्ये जात होते. त्यासाठी प्रवाशांची लगबग सुरु होती. पण अचानक विमानतळावर आगीचा भडका उडला आणि एकच खळबळ उडाली. प्रवाशांची प्रचंड पळापळ सुरु झाली. त्यामुळे विमानतळावर भीतीचं वातावरण निर्माण झालं. अखेर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. यावेळी विमानतळावर प्रशासनाची देखील चांगलीच तारांबळ उडालेली बघायला मिळाली.
संबंधित घटना ही पश्चिम बंगालची राजधानी असलेल्या कोलकाता येथील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळाला आज रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली. आगीमुळे तिथे उपस्थित असलेल्या प्रवाशांचा प्रचंड गोंधळ उडाला. विमानतळाच्या चेक इन काउंटरजवळ आग लागली होती. शॉर्ट सर्किटमुळे आगीची घटना घडली, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.
नेमकं काय घडलं?
विमानतळावर कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कोलकाता विमानतळाच्या गेट क्रमांक 3A च्या 16 क्रमांकाच्या डिपार्चर काउंटरजवळ ही आग लागली. रात्री नऊ वाजेच्या सुमारास विमानतळाच्या गेट क्रमांक 3 वर अचानक धुराचे लोट आल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर लगेच विमानतळावर तैनात असलेल्या सीआयएसएफच्या जवानांना याबाबतची माहिती देण्यात आली.
सीआयएसएफ जवानांनी तातडीने विमानतळ परिसर पूर्णपणे रिकामा करून घेतला. आग लागल्यानंतर सर्व प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवळपास तीन गाड्यांच्या मदतीने ही आग आटोक्यात आली.
कोणतीही जीवितहानी नाही
या आगीमुळे आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. सर्व प्रवाशांना वेळीच बाहेर काढण्यात आले. सध्या विमानतळावर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, अति धुरामुळे एक जण आजारी पडलाय. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, अशी देखील माहिती मिळत आहे.
विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये भीषण आग लागली होती. भोपाळच्या ‘सातपुडा भवन’ला लागलेल्या आगीमुळे अनेक सरकारी फायली जळून खाक झाल्या होत्या. सातपुडा भवनमध्ये मध्य प्रदेश सरकारची अनेक सरकारी कार्यालये आहेत. सातपुडा भवनातील आग इतकी भीषण होती की मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी केंद्र सरकारकडे मदत मागितली होती.
