बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या प्रमुखांचा पीएम नरेंद्र मोदींना फोन
बांगलादेशमधील परिस्थिती सध्या तणावपूर्ण आहे. अनेक ठिकाणी अजूनही अल्पसंख्यांक असुरक्षितपणे वावरत आहेत. त्यामुळे हिंदू समुदायाबाबत भारताने चिंता व्यक्त केलीये. या दरम्यान बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला आहे.

बांगलादेशात कोटा सिस्टमच्या विरोधात आंदोलनादरम्यान आंदोलन हिंसक झालं. त्यानंतर शेख हसीना यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला इतकंच नाही तर त्यांना देश देखील सोडावा लागला. आता शेख हसीना या सध्या भारतात आहेत. बांगलादेशमधून निघताना त्यांनी भारताकडे आश्रय मागितला होता. त्या आता दिल्ली जवळ एअर फोर्सच्या विमानतळावर सुरक्षित आहेत. या सगळ्या घडामोडीननंतर बांगलादेशमधील अंतरिम सरकारचे प्रमुख प्रो मोहम्मद युनूस यांनी पंतप्रधान मोदींशी फोनवर चर्चा केलीये. पंतप्रधान मोदींनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. पीएम मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले की, बांगलादेश सरकारचे सल्लागार प्रोफेसर मुहम्मद युनूस यांनी माझ्याशी फोनवर चर्चा केली. सद्यस्थितीवर त्यांनी माहिती दिली.
पीएम मोदींनी पुढे लिहिले की, मोहम्मद युनूस यांनी लोकशाही, स्थिर, शांततापूर्ण आणि प्रगतीशील बांगलादेशासाठी भारताच्या समर्थनाचा पुनरुच्चार केला. बांगलादेशातील हिंदू आणि सर्व अल्पसंख्याकांच्या सुरक्षेची, सुरक्षिततेची आणि संरक्षणाची ग्वाही त्यांनी दिली. बांगलादेशमध्ये अंतरिम सरकार स्थापन झाल्यानंतर देशातील सर्वोच्च नेतृत्वाने भारताच्या सर्वोच्च नेतृत्वाशी चर्चा करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
युनूस यांनी 8 ऑगस्ट रोजी घेतली शपथ
8 ऑगस्ट रोजी, मोहम्मद युनूस यांनी बांगलादेशातील शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडल्यानंतर अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार म्हणून शपथ घेतली. युनूस यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मोदींनी त्यांचे अभिनंदन केले आणि बांगलादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्याक समुदायांची सुरक्षा सुनिश्चित करण्याचे आवाहन केले. भारताच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त, पंतप्रधान मोदी यांनी हिंसाचारग्रस्त बांगलादेशातील परिस्थिती लवकरच पूर्वपदावर येईल अशी आशा व्यक्त केली होती. शेजारील देशातील हिंदू आणि अल्पसंख्याकांच्या सुरक्षेबाबत 140 कोटी भारतीय चिंतेत असल्याचे ते म्हणाले होते.
बांगलादेशात हिंदू समाजाविरोधातील हिंसाचार वाढला
बांगलादेशात शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडल्यानंतर हिंदू समुदायाच्या सदस्यांविरोधातील हिंसाचार वाढला आहे. नोकऱ्यांमधील वादग्रस्त आरक्षण व्यवस्थेवरून सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर निदर्शने झाली ज्यात अनेक लोकं मारली गेली. त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला होता आणि 5 ऑगस्ट रोजी भारतात आल्या होत्या.
