COVID Vaccine | कोव्हिड लस सर्वात आधी कोणाला मिळणार? डॉ. हर्ष वर्धन यांचं उत्तर

खासगी आणि सरकारी अशा दोन्ही क्षेत्रातील डॉक्टर, परिचारिका, स्वच्छता कर्मचारी, आशा सेविका, सुरक्षा अधिकारी यांना प्राधान्याने लस देणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:27 PM, 4 Oct 2020

नवी दिल्ली : कोव्हिडवर लस (COVID Vaccine) सापडल्यानंतर ती लवकरात लवकर देशातील सर्व नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी सरकार अथक प्रयत्न करत आहे, अशी ग्वाही केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन (Dr Harsh Vardhan) यांनी दिली. ‘संडे संवाद’ या साप्ताहिक कार्यक्रमात संबोधित करताना 20 ते 25 कोटी जनतेला जुलै 2021 पर्यंत लस मिळण्याची अपेक्षा असल्याचे हर्ष वर्धन यांनी स्पष्ट केले. आरोग्य सेवकांना कोव्हिड लस देण्यास प्राधान्य देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. (Health Minister Dr Harsh Vardhan expects COVID Vaccine will cover approx 20-25 crore people by July 2021)

“लस तयार झाल्यावर योग्य आणि न्याय्य वितरण होईल, याची खात्री करण्यासाठी आमचे सरकार 24 तास प्रयत्न करत आहे. देशातील प्रत्येकाला लस कशी दिली जाईल, यावर आमचा भर आहे” असेही ते म्हणाले. “कोव्हिडसंबंधी रोग प्रतिकारशक्तीबाबत आकडेवारीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत” असेही हर्ष वर्धन यांनी सांगितले.

“उच्चस्तरीय तज्ज्ञ समिती लसीच्या सर्व पैलूंचा अभ्यास करत आहे. लशीचे न्याय्य वितरण सुनिश्चित करण्यावरही त्यांचा भर आहे. आरोग्य मंत्रालय राज्य सरकारांच्या सहकार्याने लसीची तात्काळ गरज भासणार्‍या गटांची यादी करत आहे” अशी माहितीही हर्ष वर्धन यांनी दिली.

प्राधान्याने लसीची आवश्यकता असलेल्या गटांची यादी सादर करण्याच्या सूचना राज्यांना देण्यात आल्या आहेत. ज्यांना प्रथम लस घेणे आवश्यक आहे, असे खासगी आणि सरकारी अशा दोन्ही क्षेत्रातील डॉक्टर, परिचारिका, स्वच्छता कर्मचारी, आशा सेविका, सुरक्षा अधिकारी यांचा समावेश असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

सध्या देशात तीन संस्था कोरोनावरील लसीचे संशोधन करत आहेत. आरोग्य मंत्रालयाने ऑक्टोबरअखेर हे ‘वास्तववादी’ लक्ष्य ठेवले आहे. कोव्हिड लसीचे सुमारे 400 ते 500 दशलक्ष डोस प्राप्त करणे आणि त्यांचा उपयोग करणे हे सरकारचे लक्ष्य आहे. ज्याद्वारे सुमारे 20 ते 25 कोटी जनतेला जुलै 2021 पर्यंत लाभ होईल, असे ते म्हणाले. (Health Minister Dr Harsh Vardhan expects COVID Vaccine will cover approx 20-25 crore people by July 2021)

संबंधित बातम्या :

2021 च्या सुरुवातीला कोरोना लशीची अपेक्षा, मोदींच्या मार्गदर्शनात टीमचे प्रयत्न : डॉ. हर्षवर्धन

(Health Minister Dr Harsh Vardhan expects COVID Vaccine will cover approx 20-25 crore people by July 2021)