समंदर चाचा ऊर्फ ह्यूमन GPS चा गेम ओव्हर, काश्मीरमध्ये इंडियन आर्मीला मोठं यश
सुरक्षा अधिकाऱ्यांनुसार, समंदर चाचाच्या मृत्यूमुळे दहशतवादी संघटनांच्या लॉजिस्टिक नेटवर्कला मोठा झटका बसला आहे. त्याच्या मृत्यूमुळे घुसखोरीच्या अनेक योजना धुळीस मिळाल्या आहेत.

जम्मू-कश्मीरच्या गुरेज सेक्टरमध्ये सुरक्षा पथकांना मोठं यश मिळालं आहे. एन्काऊंटरमध्ये त्यांनी बागू खान उर्फ समंदर चाचाला संपवलं. दहशतवाद्यांच्या विश्वात त्याला ‘ह्यूमन जीपीएस’ म्हटलं जायचं. सुत्रांच्या माहितीनुसार, समंदर चाचासोबत आणखी एका पाकिस्तानी घुसखोराचा मृत्यू झाला. बागू खान ऊर्फ समंदर चाचा 1995 पासून पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये राहत होता. सुरक्षा एजन्सीनुसार, मागच्या तीन दशकांपासून त्याने गुरेज सेक्टर आणि आसपासच्या भागात 100 पेक्षा जास्त घुसखोरांना त्याने मदत केली. यात बहुतांश प्रयत्नात तो यशस्वी ठरला. डोंगराळ भाग आणि गुप्त रस्त्यांची सखोल माहिती यामुळे दहशतवादी संघटनांसाठी तो महत्त्वाच होता.
बागू खान ऊर्फ समंदर चाचा हिजबुल कमांडर होता. पण समंदर चाचा फक्त एका दहशतवादी संघटनेपुरता मर्यादीत नव्हता. जवळपास त्याने प्रत्येक दहशतवादी संघटनेला घुसखोरीची योजना बनवण्यात आणि ती प्रत्यक्षात आणण्यात मदत केली. म्हणूनच दहशतवादी त्याला ‘ह्यूमन जीपीएस’ म्हणून त्याला बोलवायचे.
त्यावेळी सुरक्षा पथकांनी त्याला घेरलं
सूत्रांच्या माहितीनुसार, 28 ऑगस्टच्या रात्री तो नौशेरा नार भागात एका घुसखोरीला मदत करत होता. त्यावेळी सुरक्षा पथकांनी त्याला घेरलं. चकमकीत समंदर चाचा आणि त्याच्यासोबत एक दहशतवादी मारला गेला. 29 ऑगस्टच्या सकाळी सुद्धा त्या भागात गोळीबार आणि शोध मोहिम सुरु होती.
लॉजिस्टिक नेटवर्कला मोठा झटका
सुरक्षा अधिकाऱ्यांनुसार, समंदर चाचाच्या मृत्यूमुळे दहशतवादी संघटनांच्या लॉजिस्टिक नेटवर्कला मोठा झटका बसला आहे. त्याच्या मृत्यूमुळे घुसखोरीच्या अनेक योजना धुळीस मिळाल्या आहेत. समंदर चाचा अनेक वर्ष सुरक्षा यंत्रणांना चकवा देत होता.
