व्हॉट्सॲप चॅटमुळे नवरा बायकोत तुफान भांडण, तो ऑफिसला अन् मागे तिने… हादरावणारी घटना समोर
Husband Wife Fight : झाशी येथून एक हादरावणारी घटना समोर आली आहे. एका नवविवाहित जोडप्यात व्हॉट्सअॅप चॅटवरून मोठा वाद झाला. यानंतर नववधूने उचललेले पाऊल अतिशय धक्कादायक आहे.

नवरा बायकोच्या भांडणाच्या अनेक बातम्या तुम्ही वाचल्या असतील. आता उत्तर प्रदेशातील झाशी येथून एक हादरावणारी घटना समोर आली आहे. एका नवविवाहित जोडप्यात व्हॉट्सअॅप चॅटवरून मोठा वाद झाला. यानंतर नववधूने उचललेले पाऊल अतिशय धक्कादायक आहे. या विवाहितेने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. आता या घटनेला वेगळे वळण मिळाले आहे. यात हुंडाबळीचा आरोप केला जात आहे. या घटनेनंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून या घटनेचा तपास सुरू केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
फेब्रुवारी 2025 मध्ये लग्न
उत्तर प्रदेशातील झाशीच्या सिपरी बाजार पोलिस स्टेशन परिसरातील मिशन कंपाऊंडमध्ये ही घटना घडली आहे. 25 वर्षीय काजल पटेलचा विवाह टीटीई भुवनेंद्र पटेल 24 फेब्रुवारी 2025 रोजी झाला होता. कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी काजल घरी असताना तिच्या पतीने तिला व्हॉट्सअॅपवर कोणाशी तरी गप्पा चॅटिंग करताना पाहिले. यामुळे दोघांमध्ये वाद झाला. यानंतर भुवनेंद्र कामावर निघून गेला. त्यानंतर काजलने विष प्राशन केले. यानंतर तिची प्रकृती बिघडली, त्यामुळे तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रविवारी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
हुंड्यासाठी छळाचा आरोप
मृत काजलचे काका अरविंद कुमार यांनी तिच्या सासरच्या लोकांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटले की, लग्नाच्या वेळी काजलच्या कुटुंबाने त्यांच्या ऐपतीप्रमाणे हुंडा दिला होता. मात्र लग्नानंतर तिच्या सासरचे लोक चारचाकी गाडीची मागणी करत होते. गाडी न दिल्याने तिचा मानसिक छळ केला जात होता. त्यामुळे आता काजलने स्वतः विष प्राशन केले की तिला असे करण्यास भाग पाडले गेले याची निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी तिच्या पालकांनी केली आहे.
या घटनेनंतर काजलचा मोबाईल फोन देण्यास सासरच्या लोकांनी तो नकार दिला. त्यामुळे सासरची मंडळी प्रकरणातील सत्य दडपण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप होत आहे. सिपरी बाजार पोलिस स्टेशनचे प्रभारी विनोद कुमार मिश्रा यांनी याबाबत बोलताना सांगितले की, ‘प्राथमिक माहितीनुसार पती-पत्नीमध्ये व्हॉट्सअॅप चॅटवरून वाद झाल्याचे समोर आले आहे. त्यानंतर काजलने विष प्राशन केले. या घटनेनंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून पंचनामा केला आहे. आता शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.
