पाकिस्तानच्या गोळीबारात 2 जवान शहीद, 5 निष्पाप नागरिकांचा बळी; सीमावर्ती भागात तणाव कायम

शनिवारी भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी करण्यात आली. मात्र, जम्मू-काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी युद्धबंदीचे उल्लंघन झाले. पाकिस्तानी हल्ल्यात अनेक नागरिक आणि सुरक्षा अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पाकिस्तानच्या गोळीबारात 2 जवान शहीद, 5 निष्पाप नागरिकांचा बळी; सीमावर्ती भागात तणाव कायम
india pakistan (1)
| Updated on: May 11, 2025 | 11:48 AM

शनिवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाली. दोन्ही देशांच्या सहमतीनंतर याबद्दल घोषणा करण्यात आली. मात्र, यानंतरही जम्मू-काश्मीरमधील अनेक भागांमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आले. त्यामुळे अजूनही तणाव कायम आहे. शस्त्रसंधीपूर्वी पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात २ सुरक्षा अधिकारी आणि ५ सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला होता, अशी माहिती जम्मू-काश्मीर प्रशासनानं दिली. या हल्ल्यात २५ हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, काल १० मे रोजी सकाळी सुमारे ५ वाजता पाकिस्तानकडून जम्मू शहर आणि इतर भागांमध्ये अनेक हल्ले झाले. नियंत्रण रेषेवरही जोरदार गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानी हल्ल्यानंतर प्रशासन सतर्क झालं आहे. सध्या जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात येत आहे. पाकिस्तानने ड्रोनच्या माध्यमातून निवासी भागांना लक्ष्य केलं होतं.

पाकिस्तानी हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू?

जम्मू-काश्मीरच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजौरीचे अतिरिक्त जिल्हा विकास आयुक्त राज कुमार थापा आणि त्यांचे दोन कर्मचारी हे हल्ल्यात जखमी झाले आहेत. राजौरी शहरामधील त्यांच्या शासकीय निवासस्थानी तोफगोळ्याने हल्ला करण्यात आला. त्यात ते गंभीर जखमी झाले. या हल्ल्यानंतर थापा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जिथे त्यांचा मृत्यू झाला. याशिवाय, राजौरी शहरातील एका औद्योगिक क्षेत्राजवळ झालेल्या गोळीबारात मोहम्मद इम्तियाज आणि इतर दोन नागरिकांचा मृत्यू झाला. यात दोन वर्षांची आयशा नूर आणि मोहम्मद शोहिब (वय ३५) यांचाही मृत्यू झाला.

पूंछ जिल्ह्यातील मेंढर सेक्टरमधील कंघरा-गलहुट्टा गावात ५५ वर्षीय राशिदा बी यांच्या घरावर मोर्टारचा गोळा पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. जम्मूच्या बाहेरील बंटालाब भागातील खेरी केरन गावात गोळीबार झाला. या गोळीबारात झाकीर हुसैन (४५) यांचा मृत्यू झाला. तर एक मुलगी आणि इतर दोन जण जखमी झाले.

बाजारपेठा बंद

भारत आणि पाकिस्तान युद्धबंदीसाठी तयार झाले आहेत. विदेश सचिव विक्रम मिस्री यांनी घोषणा केली की, दोन्ही देशांच्या लष्करी ऑपरेशन्सच्या महानिदेशकांनी शनिवारी सायंकाळी ५ वाजल्यापासून जमीन, हवा आणि समुद्रातील सर्व गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात १० मे रोजी सायंकाळी ५ वाजता शस्त्रसंधी झाली. यानंतरही अनेक भागांमध्ये गोळीबार पाहायला मिळाला. तर दुसरीकडे, भारतीय सैन्यानंही याला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. शस्त्रसंधीनंतरही जम्मू-काश्मीरमधील अनेक भागांमधील बाजारपेठा बंद आहेत आणि मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आलं आहे.