Pahalgam Terrorist Attack : ठरलं! अमेरिका पण तयार, या तिघांना दिली जाणार पहलगाम हल्ल्याची शिक्षा
India Pakistan Tension : पहलगाम हल्ल्याने सध्या दक्षिण आशियात युद्धाचे ढग जमले आहेत. भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. पाकिस्तान तर पुरता भेदरला आहे. त्यात अमेरिकेने एंट्री घेतल्यानंतर या हल्ल्यातील दोषींना स्वप्नात वाटली नसेल अशी शिक्षा मिळणार आहे.

पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यात इतका वेळ का लावण्यात येत आहे, असा सवाल विरोधकांच्याच नाही तर जनतेच्या मनात सुद्धा आहे. पण या हल्ल्यातील दोषींना अशी शिक्षा मिळणार आहे की, त्याचा त्यांनी स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल. भारताने त्याची तयारी सुरू केली आहे. तर सरकार जागतिक मंचावर पाकिस्तानला एकटे पाडण्याची पण तयारी करत आहे. पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र म्हणून जाहीर करण्याची शक्यता असतानाच एक मोठी अपडेट समोर येत आहे. बुधवारी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि अमेरिकेतील परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्यात चर्चा झाली. त्यात त्यांनी या हल्ल्यातील तिघांना शिक्षा करण्यात येईल असे स्पष्ट केले. काय आहे ती एक्सवरील पोस्ट, का होत आहे तिची चर्चा?
X वरील ती पोस्ट व्हायरल
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी बुधवारी सोशल मीडिया एक्सवर एक पोस्ट लिहिली आहे. त्यानुसार अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांच्याशी पहलगाम दहशतवादी हल्ल्याविषयी चर्चा झाली. हल्ला करणारे दहशतवादी, त्यांचे समर्थक आणि या हल्ल्याचा कट रचणाऱ्यांना शिक्षा देण्यात येईल. या तिघांवर पहलगाम हल्ल्याची जबाबदारी निश्चित करत त्यांना कडक शिक्षा देण्यात येईल.
Discussed the Pahalgam terrorist attack with US @SecRubio yesterday. Its perpetrators, backers and planners must be brought to justice.
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) May 1, 2025
रुबियोंची जयशंकर आणि शरीफ यांच्यासोबत चर्चा
मार्को रुबियो यांनी बुधवारी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याशी स्वतंत्र चर्चा केली. रुबियो यांनी पहलगाम हल्ल्यात प्राण गमावलेल्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी दु:ख व्यक्त केले. दहशतवादाविरोधात अमेरिका भारताच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचे रुबियो यांनी स्पष्ट केले. त्यांनी दोन्ही देशातील तणाव कमी करण्याचे आणि दक्षिण आशियात शांतता आणि सुरक्षितता ठेवण्याचा आग्रह धरला. पहलगाम हल्ल्याप्रकरणात त्यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना चांगलेच सुनावले. या हल्ल्याचा निषेध करण्यावर त्यांनी शरीफ यांच्याशी चर्चेदरम्यान जोर दिला. तसेच पाकिस्तानी अधिकार्यांनी भारतासोबत सहकार्य करण्याचा आग्रह धरला.
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव
पहलगाम दहशतवादी हल्ला 22 एप्रिल रोजी झाला होता. तेव्हापासून दोन्ही देशात तणाव वाढला आहे. या हल्ल्यात 26 निरपराध पर्यटकांचा मृत्यू झाला होता. दहशतवाद्यांनी धर्म विचारून हत्या केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. तर त्यांना वाचवण्यासाठी पुढे आलेल्या स्थानिक मुस्लिमाची सुद्धा हत्या करण्यात आली. त्यानंतर भारताने सिंधू पाणी वाटप करार रद्द केला. व्हिसा रद्द करण्याचा, पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडण्याचे आणि पाकिस्तानातील भारतीयांना देशात परतण्याचे आदेश दिले होते.
