India Pak war : पाकचा पुन्हा नापाक डाव, नागरी विमानांची ढाल करत हल्लेखोर कारवाया

भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर सद्यस्थितीची माहिती देण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय सचिव आणि रक्षा मंत्रालयातर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली.

India Pak war : पाकचा पुन्हा नापाक डाव, नागरी विमानांची ढाल करत हल्लेखोर कारवाया
कर्नल सोफिया कुरेशी
Image Credit source: social media
| Updated on: May 10, 2025 | 11:50 AM

पाकिस्तानने लाहोरहून उड्डाण करणाऱ्या नागरी विमानांची ढाल करत आंतरराष्ट्रीय हवाईमार्गाचा दुरूपयोग केला. आपल्या कारवाया लपवण्यासाठी त्यांनी हा नापाक डाव रचल्याचे सांगत हा चिंतेचा विषय असल्याचे कर्नल सोफिया कुरेशी यांनी नमूद केलं. पाकिस्तानने अजूनही आपले नागरी हवाई क्षेत्र बंद केलेलं नाही. पाकिस्तानच्या या रडीच्या डावामुळे भारतीय सेनेला आंतरराष्ट्रीय नागरी सुरक्षेचे नियम लक्षात घेऊन अत्यंत संयम बाळगत सावधपणे, विचारपूर्वक प्रत्युत्तरात्मक कारवाई करावी लागली, असे त्या म्हणाल्या. पाकिस्तानचा प्रत्येक हल्ला परतवून लावला असल्याचं भारताने स्पष्ट केलं.

ऑपरेशन सिंदूरनंतर गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून भारतावर सातत्याने करण्यात येणारे ड्रोन, मिसाइल हल्ले यांना भारत चोख प्रत्युत्तर देत आहे. भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर सद्यस्थितीची माहिती देण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय सचिव आणि रक्षा मंत्रालयातर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली.

पाकिस्तानने सीमेवर हवाई हल्ले केले तसेच भारतीय हवाई तळांवर हल्ले केले. पंजाबच्या एअर बेसवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती कर्नल सोफिया कुरैशी यांनी या पत्रकार परिषदेत दिली. पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यांना रोखण्यासाठी भारताने चोख प्रत्युत्तर दिले. भारत संयम बाळगेल, मात्र त्यासाठीच पाकिस्तानने संयम बाळगण्याची गरज आहे, अन्यथा भारतही जोरदार प्रत्युत्तर देईल, असे या पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आलं.

पाकिस्तानने भारतातील नागरी वस्ती आणि लष्करी तळांना लक्ष्य करुन हल्ले केले. ड्रोन आणि क्षेपणास्त्राच्या साह्याने शाळा आणि वैद्यकीय सेंटरला लक्ष्य केलं, असे कर्नल कुरैशी यांनी म्हटले.

तो दावा खोटा

तसंच भारताची एस-400 ही यंत्रणा निष्क्रीय केल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. मात्र हा दावा अतिशय निराधार आणि खोटा असल्याचं आज भारत सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं. भारतीय एस-400 प्रणाली नष्ट केल्याचे, सुरत आणि सिरसा येथील हवाई तळ उद्ध्वस्त केल्याचे दावे करून, सतत चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला आहे. मात्र पाकिस्तानने पसरवलेल्या या खोट्या दाव्यांचे भारत स्पष्टपणे खंडन करतो”, असे आजच्या पत्रकार परिषेदत नमूद करण्यात आलं.

पाकिस्तानने भारतातील 26 ठिकाणी हल्ले करण्याचा प्रयत्न केला, भारताने ते प्रयत्न हाणून पाडत चोख प्रत्युत्तर दिलं. तसेच भारताने पाकिस्तानचे सहा एअरबेस उद्ध्वस्त केले आहेत, असेही या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं.