‘…तर भारत पाकिस्तानात घुसून हल्ला करणार’, जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत दहशतवाद्यांचे पाकिस्तानातील तळ उद्ध्वस्त केले होते. त्यानंतर आता एस जयशंकर यांनी पाकिस्तानला कडक इशारा दिला आहे.

गेल्या महिन्यात भारत आणि पाकिस्तानदरम्यान तणावाचे वातावरण तयार झाले होते. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत दहशतवाद्यांचे पाकिस्तानातील तळ उद्ध्वस्त केले होते. या कारवाईला १ महिना पूर्ण झाला आहे. आता भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर युरोपच्या दौऱ्यावर गेले आहेत. एस जयशंकर यांनी बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्समध्ये बोलताना पाकिस्तानला कडक इशारा दिला आहे. पाकिस्तानने दहशतवादी हल्ल्यांनी चिथावणी दिली तर आम्ही पाकिस्तानच्या आत घुसून हल्ला करु असं जयशंकर यांनी म्हटलं आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणन घेऊयात.
एस जयशंकर नेमकं काय म्हणाले?
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बेल्जियमध्ये बोलताना म्हटले की, पाकिस्तान दहशतवाद्यांना उघडपणे प्रशिक्षण देत आहे आणि त्यांना भारतात पाठवत आहे. आता भारत हे सहन करणार नाही. जर त्यांनी एप्रिल महिन्यात केलेली क्रूर कृत्ये थांबवली नाहीत तर त्यांना भारताकडून दिल्या जाणाऱ्या प्रत्युत्तराला सामोरे जावे लागेल. दहशतवाद्याची तळे उद्धवस्त केली जातील. दहशतवादी पाकिस्तानच्या आत असतील तर आम्हीही पाकिस्तानच्या आत घुसुन बदला घेऊ.’
पुन्हा युद्ध होणार?
भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटले की, भारत-पाकिस्तानातील संघर्षाची मूळ कारणे अजूनही तशीच आहेत. पाकिस्तान हा असा देश आहे जो दहशतवादाचा वापर प्रशासकीय धोरणाचे साधन म्हणून करतो.’ जयशंकर यांना युद्ध पुन्हा सुरु होणार का हे विचारण्यात आले होते. यावर बोलताना जयशंकर म्हणाले की “जर दहशतवादी कारवाया सुरु राहिल्या तर आगामी काळात संघर्ष पुन्हा सुरु होऊ शकते.”
जयशंकर यांचे राफेल आणि युद्धबंदीवरही भाष्य
एस जयशंकर यांना ऑपरेशन सिंदूर दरम्यान झालेल्या नुकसानीबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्यांनी सांगितले की, भारताच्या लढाऊ विमाने आणि क्षेपणास्त्रांमुळे पाकिस्तानी हवाई दलाचे मोठे जास्त नुकसान झाले आहे. याच कारणामुळे पाकिस्तान शांत झाला. राफेल विमाने आणि इतर यंत्रणा किती यशस्वी झाल्या याचा पुरावा पाकिस्तानचे नष्ट झालेले हवाई तळ आहेत.१० मे रोजी भारत आणि पाकिस्तानमधील लढाई फक्त एकाच कारणामुळे थांबली आणि ती म्हणजे भारताने पाकिस्तानच्या ८ महत्त्वाच्या हवाई तळांवर केलेले हल्ले. याचे फोटो देखील उपलब्ध आहेत अशी माहितीही जयशंकर यांनी दिली.