डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोनमुळे मोदींची माघार, देशात काँग्रेसचे सरकार असते तर.., राहुल गांधींचे विधान चर्चेत

भारतीय सशस्त्र दलांनी प्रथम ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा केला होता, मात्र त्यानंतर युद्धबंदीचा निर्णय घेण्यात आला. याबाबत खासदार राहुल गांधींना मोठे विधान केले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोनमुळे मोदींची माघार, देशात काँग्रेसचे सरकार असते तर.., राहुल गांधींचे विधान चर्चेत
Rahul Gandhi
| Updated on: Jun 03, 2025 | 7:15 PM

एप्रिल महिन्यात भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर संघर्ष पहायला मिळाला होता. भारतीय सशस्त्र दलांनी प्रथम ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा केला होता, तसेच पाकिस्तानने केलेले हल्ले परतवून लावले होते. मात्र काही काळानंतर युद्धबंदीचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता यावर भाष्य करताना राहुल गांधी यांनी या युद्धबंदीबाबत केंद्र सरकारवर मोठा आरोप केला आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोननंतर मोदींची माघार

खासदार राहुल गांधी यांनी भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीबाबत केंद्र सरकारवर मोठा आरोप केला आहे. राहुल गांधींनी म्हटले की, ‘अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लगेच शरणागती पत्करली. भाजप-आरएसएसचे वैशिष्ट्य असे आहे की ते नेहमीच नतमस्तक होतात. पण जर देशात काँग्रेसचे सरकार असते तर कधीही शरणागती पत्करली नसती.’

मी भाजप आणि आरएसएसवाल्यांना चांगलं ओळखतो – गांधी

राहुल गांधी यांनी भोपाळमधील भाषणादरम्यान म्हटले की, मी आरएसएस आणि भाजपला चांगले ओळखतो. जर त्यांच्यावर थोडासा दबाव आणला तर ते घाबरून पळून जातात. त्यामुळे जेव्हा ट्रम्पने मोदीजींना इशारा दिला तेव्हा त्यांनी ट्रम्पच्या आदेशांचे पालन केले. स्वातंत्र्याच्या काळापासून त्यांना शरणागती पत्रे लिहिण्याची सवय आहे.’ आता राहुल गांधींच्या या आरोपांमुळे राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. भाजपकडून राहुल गांधींना काय उत्तर दिले जाते ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

ऑपरेशन सिंदूर सुरूच राहणार

जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला होता. यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूरची घोषणा केली होती. याअंतर्गत भारतीय सैन्याने १०० पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. तसेच पाकिस्तानच्या हवाई तळांवर हल्ले केले होते. मात्र युद्धबंदी जाहीर झाल्यानंतर भारत सरकारने हे जाहीर केले आहे की,ऑपरेशन सिंदूर स्थगित करण्यात आले आहे, मात्र ते अद्याप संपलेले नाही.