ट्रम्प-मुनीर ‘लंच डिप्लोमेसी’वर इराण संतापला, पाकिस्तानला दिली थेट ही धमकी
इराण-इस्त्रायल संघर्ष आहे. त्यामध्ये तिसऱ्या पक्षाने येऊ नये. या संघर्षात तिसरा देश आला तर त्याला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागणार आहे, असा इशारा इराणकडून पाकिस्तानला देण्यात आला.

इराण आणि इस्त्रायल यांच्यात तणाव सुरु आहे. या तणावादरम्यान पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आसीम मुनीर यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना लंचसाठी बोलवले होते. त्यांच्यात दोन तास चर्चा झाली होती. ट्रम्प-मुनीर ‘लंच डिप्लोमेसी’वर इराण संतापला आहे. इराणने म्हटले आहे की, इराण-इस्त्रायल युद्धात तिसरा देश सहभागी झाल्यास त्याला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागणार आहे. भारतातील इराणी दुतावासातील उपमिशन प्रमुख जावेद हुसैनी यांनी हा इशारा दिला. ते म्हणाले, पाकिस्तान आमच्यासोबत राहील, ही आमची अपेक्षा आहे. इस्त्रायलला आज थांबवले नाही तर पुढे अनेक देश असा हल्ला करु शकतात, पाकिस्तानने हे लक्षात घ्यावे. या संघर्षात तिसरा देश आल्यास त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील.
आसीम मुनीर यांच्या अमेरिका दौऱ्यावर…
पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आसीम मुनीर यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. याबाबत प्रश्न विचारल्यावर जावेद हुसैनी म्हणाले, इराण-इस्त्रायल संघर्ष आहे. त्यामध्ये तिसऱ्या पक्षाने येऊ नये. आमच्याकडे काही अघोषित शक्ती आहेत. त्या भविष्यासाठी आम्ही सुरक्षित ठेवल्या आहेत. या संघर्षात तिसरा देश आला तर त्याला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागणार आहे. आसीम मुनीर यांच्या अमेरिका दौऱ्यावर आम्ही लक्ष ठेवले आहे, असे जावेद हुसैनी यांनी म्हटले.
जावेद हुसैनी म्हणाले, काही आठवड्यांपूर्वी आसीम मुनीर यांनी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनेई यांची भेट घेतली होती. आता ते डोनाल्ड ट्रम्प यांना भेटले. त्यावर सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. पाकिस्तान इराणसोबत आहे की अमेरिकेसोबत? असा प्रश्न विचारला जात आहे. भारतासंदर्भात आमची कोणतीही नाराजी नाही, असे हुसैनी यांनी स्पष्ट केले.
IAEA आणि G7 वर टीका
आंतराष्ट्रीय अणूउर्जा आयोग (IAEA) आणि G7 इस्त्रायलच्या इशाऱ्यावर काम करत आहे. या दोन्ही संस्था नेहमी पक्षपाती राहिल्या आहेत, असे जावेद हुसैनी यांनी म्हटले. ते पुढे म्हणाले, इराणने अण्वस्त्र प्रसारबंदी करारावर सही केली आहे. परंतु आम्ही विना अट आत्मसमर्पण करणार नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांनी इराणाने विना अट आत्मसमर्पण करावे, असे दोन दिवसांपूर्वी म्हटले होते. त्यावर हुसैनी यांनी हे उत्तर दिले.
