एअरपोर्टही बंद, बॉम्ब हल्लेही सुरुच, इराणमधील भारतीयांना सुरक्षित कसे काढणार? काय आहेत पर्याय?
Israel-Iran War: भारत सरकारने संयुक्त अरब अमीरात आणि अर्मेनियासोबत संवाद साधला आहे. यूएईचे इस्त्रायल आणि इराणसोबत दोन्ही देशांसोबत संबंध चांगले आहेत. हवाई मार्ग बंद असल्याने इतर पर्यायांवर विचार केला जात आहे.

इस्त्रायलकडून इराणवर भीषण हल्ले सुरु आहे. इराणची राजधानी तेहरानवर क्षेपणास्त्र आणि बॉम्बचा मारा केला जात आहे. त्यामुळे इराणमधील विमानतळ बंद आहे. या परिस्थितीत इराणमध्ये असलेल्या भारतीय विद्यार्थी आणि नागरिकांना स्वदेशात कसे आणले जाणार? असा प्रश्न आहे. इराणसोबत इस्त्रायल, सीरिया, इराकमधील विमानतळही युद्धामुळे बंद ठेवली आहेत. त्यामुळे भारतीयांना इराणमधून आणण्यासाठी जमिनी मार्ग किंवा समुद्र मार्गाचा पर्याय असणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भारत सरकारने संयुक्त अरब अमीरात आणि अर्मेनियासोबत संवाद साधला आहे. पराराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी या दोन्ही देशांशी चर्चा केली आहे. सध्या इराणमध्ये असलेल्या 120 भारतीय विद्यार्थ्यांना अर्मेनियाच्या मार्गाने बाहेर काढले जात आहे. अर्मेनियाची सीमा इराणशी जुळली आहे. तसेच दोन्ही देशांचे संबंधही चांगले आहेत. इराणची सीमा पाकिस्तान आणि बलुचिस्तान प्रांतालाही लागून आहे. परंतु त्या मार्गाने आणता येणे अवघड आहे. सध्या भारताचा प्रयत्न तेहरान आणि इराणच्या अन्य शहरांमध्ये असलेल्या भारतीयांना सुरक्षित स्थळी हलवण्याचा आहे.
भारताने यूएईसोबतही चर्चा सुरु केली आहे. कारण इस्त्रायल आणि इराणसोबत दोन्ही देशांचे संबंध चांगले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, भारतीयांना सुरक्षित स्थानावर पोहचवले जात आहे. भारतीय दुतावासाकडून हेल्पलाइन क्रमांकही सुरु करण्यात आला आहे. कोम या शहरात मोठ्या संख्येने भारतीय विद्यार्थी पोहचले आहे. हे शहर तेहरानपासून १४८ किलोमीटर अंतरावर आहे. इराणमध्ये एकूण १५०० भारतीय विद्यार्थी आहे.
इराण सरकारने म्हटले आहे की, एअरस्पेस बंद आहे. परंतु जमिनी सीमा खुल्या आहेत. त्या ठिकाणावरुन भारतीय नागरिकांना बाहेर काढता येणार आहे. भारतासह आम्हाला अनेक देशांकडून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी मदतीची विनंती केली आहे. कोणताही देश आपल्या राजनयिक अधिकाऱ्यांना किंवा नागरिकांना बाहेर काढण्यासाठी या सिमांचा वापर करु शकतो. आपल्या नागरिकांचे नाव, वाहन क्रमांक, पासपोर्ट क्रमांक दिल्यावर त्यांना बाहेर काढण्यास मदत करण्यात येणार असल्याचे इराणने म्हटले आहे.
