पहलगाममध्ये दहशतवाद्यांची नव्हे तर पर्यटकांची चूक..; पोलीस कोठडीत ज्योती मल्होत्रा नेमकं काय म्हणाली?

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्राने पोलीस कोठडीत धक्कादायक वक्तव्य केलं आहे. पहलगाममध्ये पर्यटकांचीच चूक होती, असं तिने म्हटलंय. ज्योतीला पाच दिवस पोलीस कोठडीत पाठवलं आहे.

पहलगाममध्ये दहशतवाद्यांची नव्हे तर पर्यटकांची चूक..; पोलीस कोठडीत ज्योती मल्होत्रा नेमकं काय म्हणाली?
Jyoti Malhotra
Image Credit source: Tv9
| Updated on: May 20, 2025 | 9:48 AM

पाकिस्तानसाठी हेरगिरी प्रकरणी देशभरात अटकसत्र सुरूच आहेत. गेल्या दोन आठवड्यात हरियाणातील युट्यूबर ज्योती मल्होत्रासह जवळपास 12 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तपासादरम्यान असं दिसून आलं की हे सर्वजण उत्तर भारतात सक्रिय असलेल्या एका शेजारील देशाशी जोडलेल्या हेरगिरी नेटवर्कचा भाग होते. यापैकी 6 जण पंजाबमधून आणि चार जण हरियाणामधून पकडले गेले आहेत. युट्यूबर ज्योती मल्होत्राला शनिवारी पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवण्यात आलं होतं. पोलीस कोठडीदरम्यान जेव्हा ज्योतीला पाकिस्तानी लोकांचं कौतुक करणाऱ्या तिच्या व्हिडीओंबद्दल प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा असे व्हिडीओ बनवणं हा तिच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार असल्याचं उत्तर तिने दिलं. या व्हिडीओंद्वारे ती तिच्या सबस्क्राइबर्ससमोर तिचा मुद्दा मांडत होती, असं तिने म्हटलंय. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या लोकांना ती सावध राहण्याचा सल्ला देत होती.

पहलगाम हल्ल्यानंतरच्या व्हिडीओमध्ये ज्योती मल्होत्रा म्हणाली, “जे काही घडलं ते आमच्या (पर्यटकांच्या) चुकीमुळे झालं. जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा आपण सतर्क आणि जागरूक राहिलं पाहिजे. पहलगाम घटनेसाठी मी सरकारला दोष देते. कारण पहलगाममध्ये योग्य सुरक्षा नव्हती.” 16 मे रोजी हरियाणा पोलिसांनी हिसारमधली युट्यूबर ज्योती मल्होत्राला पाकिस्तानी गुप्तचर संस्थेला संवेदनशील माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. ज्योती ‘ट्रॅव्हल विथ जो’ या नावाचं युट्यूब चॅनल चालवते. तिच्या चॅनलचे 3.77 लाख सबस्क्राइबर्स आहेत. ज्योतीविरोधात अधिकृत गुपिते कायदा आणि बीएनएसच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या ज्योती मल्होत्राचा पुरीमधील युट्यूबरशी असलेल्या संबंधांचा ओडिशा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. ही युट्यूबर कर्तारपूर साहिब गुरुद्वारा इथं जाऊन आली होती. ज्योती भारतात सर्वसामान्य नागरिकासारखी राहत होती. पण पाकिस्तानात पोहोचताच तिला व्हीव्हीआयपी वागणूक मिळत होती. दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयामध्ये काम करणाऱ्या एका पाकिस्तानी अधिकाऱ्याच्या आणि पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांमुळे तिला व्हीआयपी वागणूक मिळत होती. तिला पाकिस्तानी पोलिसांकडून सुरक्षाही मिळायची. ज्योती पाकिस्तानमधील हाय-प्रोफाइल पार्ट्यांमध्ये सहभागी व्हायची आणि तिथे गुप्तचर संस्थांव्यतिरिक्त इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटत होती.

हिसार पोलिसांकडून झालेल्या चौकशीदरम्यान ज्योतीने कबूल केलंय की ती दोन वेळा पाकिस्तानला गेली होती. इतकंच नव्हे तर तिने काश्मीरलाही भेट दिली होती. तिने एका गुप्तचर संस्थेच्या अधिकाऱ्यासोबत इंडोनेशियातील बाली इथंही भेट दिली होती. ती नेपाळलाही गेली होती.