भारतात सामान्य मुलगी, पाकिस्तानात VIP वागणूक; गुप्तहेर ज्योतीकडून अनेक गुपितं उघड
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपावरून ज्योती मल्होत्राला अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या चौकशीदरम्यान तिने अनेक गुपितं उघड केली आहेत. भारतात सर्वसामान्य मुलीसारखी वागणारी ज्योती पाकिस्तानात मात्र व्हीआयपी असल्यासारखी वावरायची.

हरियाणातील हिसार इथली रहिवासी असलेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्राला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. त्यानंतर याप्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. ज्योती भारतात सर्वसामान्य नागरिकासारखी राहत होती. पण पाकिस्तानात पोहोचताच तिला व्हीव्हीआयपी वागणूक मिळत होती. दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयामध्ये काम करणाऱ्या एका पाकिस्तानी अधिकाऱ्याच्या आणि पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांमुळे तिला व्हीआयपी वागणूक मिळत होती. तिला पाकिस्तानी पोलिसांकडून सुरक्षाही मिळायची. ज्योती पाकिस्तानमधील हाय-प्रोफाइल पार्ट्यांमध्ये सहभागी व्हायची आणि तिथे गुप्तचर संस्थांव्यतिरिक्त इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटत होती.
हिसार पोलिसांकडून झालेल्या चौकशीदरम्यान ज्योतीने कबूल केलंय की ती दोन वेळा पाकिस्तानला गेली होती. इतकंच नव्हे तर तिने काश्मीरलाही भेट दिली होती. तिने एका गुप्तचर संस्थेच्या अधिकाऱ्यासोबत इंडोनेशियातील बाली इथंही भेट दिली होती. ती नेपाळलाही गेली होती. 23 मार्च 2025 रोजी ती पाकिस्तानी दूतावासात गेली होती. तिथल्या इफ्तार पार्टीतही ती सहभागी झाली होती. तिथला व्हिडीओ तिने तिच्या युट्यूब चॅनलवर अपलोड केला होता. जेव्हा ती दूतावासात पोहोचली होती, तेव्हा दानिशने तिचं मैत्रीपूर्ण स्वागत केलं होतं. इतकंच नव्हे तर दानिशने त्याच्या पत्नीची तिच्याशी ओळख करून दिली होती. याशिवाय ती अनेक अधिकाऱ्यांनाही भेटली होती.
हिसार पोलिसांमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 2024 मध्ये पाकिस्ताननंतर ज्योती लगेचच चीनला गेली तेव्हा ती सुरक्षा यंत्रणांच्या नजरेत आली. एप्रिल 2024 मध्ये तिने जवळपास 12 दिवस पाकिस्तानचा दौरा केला होता. त्यानंतर लगेचच ती जूनमध्ये चीनला गेली. चीनमध्ये तिने आलिशान गाड्यांमध्ये दागिन्यांच्या दुकानांसह अनेक ठिकाणी दौरे केले. हे उघडकीस येताच भारतीय सुरक्षा संस्थांना तिच्या हेतू आणि खर्चाबद्दल संशय आला. त्यानंतर त्यांनी तिच्यावर पाळत ठेवण्यास सुरुवात केली. परदेशात अत्यंत महागड्या गाड्यांमध्ये प्रवास करून, व्हीआयपी रेस्टॉरंटमध्ये जेवून भारतात आल्यानंतर ज्योती मात्र एका सामान्य मुलीसारखी राहायची.
ज्योती हिसारमधील न्यू अग्रसाने कॉलनीची रहिवासी आहे. तिच्या वडिलांचं तीन खोल्यांचं एक छोटंसं घर आहे. ज्योतीचे वडील कारपेंटर असून त्यांचं उत्पन्न कमी आहे. ज्योती दिल्लीत 20 हजार रुपयांच्या पगारावर काम करत होती. लॉकडाऊनमध्ये नोकरी गमावल्यानंतर तिने युट्यूब चॅनल सुरू केलं. तिचा आजूबाजूच्या लोकांशीही फारसा संपर्क नव्हता. तिने युट्यूब चॅनलसाठी पाकिस्तान दौऱ्यावर जात असल्याचं सांगून व्हिसा घेतला होता.