देशाशी गद्दारी करून पाकिस्तानला माहिती देणाऱ्या तिघांना अटक; कोण आहेत तिघे गुप्तहेर?
हेरगिरी करणाऱ्या तिघांना अटक झाल्यानंतर संपूर्ण देशाला धक्का बसला आहे. हे तिघंही सर्वसामान्य नागरिकांसारखे भारतात राहत होते. भारतात राहून ते पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होते. या तिघांपैकी एक युट्यूबर आहे.

भारतीय भूमीत देशद्रोही कितीही हुशारीने लपले तरी ते कायद्याच्या नजरेतून सुटू शकत नाहीत, हे देशाच्या सुरक्षा यंत्रणांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ने केवळ सीमेपलीकडील शत्रूंची झोपच उडवली नाही, तर आता देशात खोटे चेहरे घेऊन फिरणाऱ्या गुप्त देशद्रोह्याचंही कंबरडं मोडलं आहे. हे तिघंही भारतात सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच राहत होते. पण त्यांचे हेतू देशाविरोधात होते. पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपावरून या तिघांना अटक करण्यात आली आहे. हे तिघं नेमके कोण आहेत, ते पाहुयात..
ज्योती मल्होत्रा
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपावरून ज्योती मल्होत्रा या हरियाणातील युटूयब ब्लॉगरला अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. ज्योतीने पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. ज्योती मल्होत्रा ही हरियाणाच्या हिसार इथली रहिवासी असून ‘ट्रॅव्हल विथ जेओ’ हे युट्यूब चॅनल ती चालवते. तिच्या चॅनलचे 3.77 लाख सबस्क्राइबर्स आहेत. तिला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयामध्ये काम करणाऱ्या एका पाकिस्तानी अधिकाऱ्याच्या ती संपर्कात होती.
13 मे रोजी या उच्चायुक्तालयातील एका पाकिस्तानी अधिकाऱ्याला हेरगिरीच्या आरोपावरून देश सोडण्यास सांगण्यात आलं होतं. या अधिकाऱ्याशी संबंधित हेरगिरीच्या कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून पंजाब पोलिसांनी ज्योतीसह दोघांना अटक केली. ज्योतीने आतापर्यंत दोन वेळा पाकिस्तानला भेट दिली असून तिच्या तिथल्या राहण्याची सोय पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील एहसान-उर-रहमान ऊर्फ दानिश याचा साथीदार अली अहवानने केली होती. अहवानने पाकिस्तानी सुरक्षा आणि गुप्तचर अधिकाऱ्यांबरोबर ज्योतीची भेट घडवून आणली होती.
देवेंदर सिंह
हरियाणाच्या कैथल इथून देवेंदर सिंह या 25 वर्षीय विद्यार्थ्यालाही याच आरोपावरून अटक करण्यात आली आहे. देवेंदर हा एका माजी लष्करी जवानाचा मुलगा आहे. बऱ्याच काळापासून पाकिस्तानच्या ISI ला गोपनीय लष्करी माहिती पाठवत असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. देवेंदर हा फेसबुकद्वारे पाकिस्तानमधील एका हँडलरच्या संपर्कात आला होता. त्याला प्रत्येक माहितीसाठी पाच ते दहा हजार रुपये मिळत होते. पोलिसांनी त्याच्या मोबाइल आणि लॅपटॉपमधून अनेक संवेदनशील कागदपत्रे आणि नकाशे जप्त केली आहेत.
नौमन इलाही
पानिपत जिल्ह्यातील नौमन इलाही या 24 वर्षांच्या युवकालाही पाकिस्तानसाठी हेरगिरीच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. नौमन हा कम्प्युटर ऑपरेटर होता. पण त्याची खरी ओळख पाकिस्तानसाठी काम करणाऱ्या ‘डार्क वेब’ गुप्तहेराची होती. नौमनने अनेकदा रेल्वे आणि लष्करी हालचालींबद्दलची माहिती परदेशी क्रमांकांवर पाठवली होती. चौकशीदरम्यान त्याने कबूल केलं की त्याने अनेकदा पैशांच्या बदल्यात लोकांकडून युएसबी ड्राइव्ह आणि कागदपत्रे घेतली होती आणि ती डार्क वेबवर अपलोड केली होती.
