
मुंबई | 17 मार्च 2024 : झारखंड राज्याचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीने अटक केली आहे. ते सध्या जेलमध्ये आहेत. मात्र, झारखंडचे सरकार पडण्याचा भाजपचा प्रयत्न फोल ठरला. आमचे नेते, आमदार, महाआघाडीचे नेते आम्ही सर्व एकत्र आहोत. ज्याप्रमाणे महाराष्ट्रात लोकांना खरेदी करून येथील सरकार पाडले. त्याचप्रमाणे झारखंडमध्ये प्रयत्न करण्यात आला होता. पण, आमच्या महाआघाडीचे सर्व आमदार, नेते यांनी सर्वांनी मिळून त्या शक्तीला दाखवून दिले की कितीही मोठी शक्ती आली तरी झारखंडमधील सरकार झुकणार नाही. आज या शिवाजीपार्कच्या भूमीतून सांगते की आमच्या भूमीत आगामी निवडणुकीत भाजपचे कमळ उगवणार नाही. जे काही असेल तर ते इंडिया आघाडीचेच असेल, असा स्पष्ट इशारा हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांनी दिला.
कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत न्याय जोडो यात्रेचा आज समारोप मुंबईत झाला. लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम कालच निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी जाहीर केला. त्यानंतर आज मुंबईतील शिवाजीपार्क मैदानात इंडिया आघाडीच्या सर्व नेत्यांनी हजेरी लावून प्रचाराचा नारळ फोडला. या सभेत बोलताना कल्पना सोरेन यांनी भाजपला मोठा इशारा दिला.
आज या व्यासपीठावर उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पुर्वेपासुन पश्चिमेपासून इथे पूर्ण देश एकवटला आहे. देशाच्या विविध भागातून आलेले विचार, आशा, पक्ष, लोक इथे आले आहेत. आमचे इंडिया इथे एकवटले आहे. त्याचसोबत जो जनसमूह इथे जमला आहे. आम्हाला जे काही यश मिळते. जे इथे व्यासपीठावर बसले आहेत. ते कुणामुळे तर तुमच्या आशीर्वादामुळे. तुमचे प्रेम, स्नेह आणि आशीर्वाद आमच्यासोबत आहेत. पण, आगामी निवडणुकीत तुम्हाला तुमच्या भविष्याची चिंता असेल तर सरकार बदलायचं आहे. कारण, समोर जी हुकुमशाही बसली आहे ती तुमचे हक्क, अधिकार यांचे हनन करण्यास बसली आहे अशी टीका त्यांनी केली.
आमचे मुख्यमंत्री बदलले आहेत. चेहरा बदलले आहेत. हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखाली गेल्या चार वर्षात झारखंडमध्ये आम्ही कल्याणकारी योजना बनविल्या. महिला, मुली, मुले, वृद्ध, दिव्यांग यांच्यासाठी योजना केल्या. त्याच योजना आमचे मुख्यमंत्री काका पुढे घेऊन जात आहे. त्यात आणखी वाढ होत आहे. पण यांनी ज्याप्रमाणे माझ्या पतीला षड्यंत्र रचून जेलमध्ये टाकले. त्याचप्रमाणे आगामी काळातही आणखी काही लोकांना जेलमध्ये टाकण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. यात आणखी काही नावे जोडली जातील, असे कल्पना सोरेन यांनी सांगितले.
काही झाले तरी तुम्हाला घाबरायचे नाही तर त्याविरोधात लढायचे आहे. आज झारखंडमध्ये एक वाक्य प्रसिद्ध झाले आहे. ते म्हणजे ‘झारखंड झुकेगा नही’. आज शिवाजीपार्कच्या या मैदानात मी हुकुमशाही शक्तीला आव्हान देते. ‘इंडिया झुकेगा नही आणि इंडिया रुकेगा नही.’ माझे सासरे शिबू सोरेन यांनी जी लढाई लढली तीच लढाई आता माझे पती हेमंत सोरेन लढत आहेत. ही लढाई लढताना ते जेलमध्ये गेले. महाआघाडी आम्ही सर्व एकत्र आहोत. झारखंड यात मागे रहाणार नाही असे त्या म्हणाल्या.
राहुल गांधी यांची ही काही आताची मेहनत नाही. गेले काही महिने ते लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी लढत आहेत. यासाठी त्यांनी मणिपूर राज्याची निवड केली जिथे आग लागली होती. मी सुद्धा एक आदिवासी महिला आहे. मणिपूरचे जे लोकांचे, महिलांचे जे हाल होत होते त्याची दाखल घेणारे कोणी नव्हते. तेथील राज्य सरकार मुके बनले आहे. केंद्र सरकार मुके बनले. पण, राहुल गांधी यांना ती पिडा दिसली आणि त्यांनी ते राज्य निवडले. हीच पिडा आज राज्याराज्यांमध्ये आहे. झारखंडमध्येही आहे. पण, झारखंडचा तो कद्दावर नेता याच मुंबईतून शक्ती घेऊन गेला होता. आज तो जेलमध्ये आहे. पण, आगामी निवडणुकीत भाजपचे कमळ झारखंडमध्ये उगवणार नाही. जे काही असेल तर ते इंडिया आघाडीचेच असेल, असा इशाराही कल्पना सोरेन यांनी यावेळी भाजपला दिला.