‘भय बिनु होइ न प्रीति…’; भारतीय सेनेचा पाकिस्तानला थेट इशारा

भारत आणि पाकिस्तानकडून युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आहे, त्यानंतर आज दोन्ही देशांच्या डीजीएमओंमध्ये चर्चा होणार आहे, त्यापूर्वी भारताच्या तीन्ही सैन्य दलाकडून महत्त्वाची संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली आहे.

भय बिनु होइ न प्रीति…; भारतीय सेनेचा पाकिस्तानला थेट इशारा
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 12, 2025 | 3:45 PM

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला, या एअर स्ट्राईकमध्ये 9 दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले होते. भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव चांगलाच वाढला होता, पाकिस्तानकडून देखील हल्ल्याचा प्रयत्न झाला, प्रत्युत्तर म्हणून भारतानं केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानचं मोठं नुकसानं झालं आहे. अखेर दोन्ही देशांकडून आता युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आहे.

भारत आणि पाकिस्तानकडून युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आहे, मात्र युद्धविरामाची घोषणा केल्यानंतर देखील पाकिस्तानने युद्धविराम तोडल्याचं पाहायला मिळालं होतं. या सर्व पार्श्वभूमीवर आज दोन्ही देशांच्या डिजोएमओमध्ये चर्चा होणार आहे, त्यापूर्वी भारतीय लष्कराच्या तीन्ही दलाची एक महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद झाली, यावेळी बोलताना पुन्हा एकदा भारतीय सेनेकडून पाकिस्तानला थेट इशारा देण्यात आला आहे.

या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना एअर मार्शल एके भारतीय यांनी पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे, आता विनंती नाही तर युद्ध होईल असं त्यांनी म्हटलं आहे.  यावेळी बोलताना त्यांनी रामचरित मानसची एक चौपाई देखील म्हटली. ‘विनय न मानत जलधि जड़, गए तीनि दिन बीति। बोले राम सकोप तब, भय बिनु होइ न प्रीति।।’ अशा शब्दात भारतीय यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे.  ‘समजदार के लिए इशारा काफी है,’  कोणत्याही प्रकारची टेक्नॉलॉजी आली तरी तिचा सामना करण्यास आम्ही तयार आहोत. मला बोलायची गरज नाही. तुम्ही स्वत: पाहिलं आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान भारताचे डीजीएमओ तथा लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी देखील यावेळी पाकिस्तानला इशारा दिला आहे,  पुढची लढाई झाली तर ती वेगळी असेल. मागच्या लढाई सारखी नसेल. कारण टेक्नॉलॉजी खूप प्रगत होत आहे. देव करो पण लढाई होऊ नये. मात्र, कोणत्याही प्रसंगासाठी आम्ही तयार आहोत. आम्ही तोंड द्यायला मजबूत आहोत, असं राजीव घई यांनी यावेळी म्हटलं आहे.