
Jyoti Malhotra Case : गेल्या अनेक दिवसांपासून ज्योती मल्होत्रा हे नाव चर्चेत आहे. ती भारतातील एक यूट्यूबर असून पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा तिच्यावर आरोप आहे. सध्या तपास संस्था तिची कसून चौकशी करत आहेत. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर एक फोटो मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. ज्योती मल्होत्रा आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांचा हा फोटो आहे. याच फोटोचा आधार घेत ज्योतीने राहुल गांधींची भेट घेतली होती, असा दावा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर या फोटोत नेमकं तथ्य काय आहे? ज्योतीने खरंच राहुल गांधी यांची भेट घेतली होती का? हे जाणून घेऊ या…
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोत खासदार राहुल गांधी दिसत आहेत. तसेच या फोटोमध्ये हेरगिरीचे आरोप असलेली यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हीदेखील दिसत आहे. हे दोघेही एकमेकांसोबत उभे असून हाच फोटो शेअर करून वेगवेगळे दावे केले जात आहेत. सत्य मात्र वेगळेच आहे.
हा फोटो खरा असल्याचा दावा करून सोशल मीडियावर तो शेअर केला जात आहे. सत्य परिस्थिती मात्र वेगळी आहे. हा फोटो एडिट करण्यात आला आहे. गुगल इमेज सर्चच्या माध्यमातून तपासले असता 2018 साली हा फोटो पोस्ट करण्यात आला होता, हे समोर आले आहे. त्या काळात ज्योती मल्होत्राने यूट्यूबर म्हणून कामही चालू केले नव्हते. या फोटोची सत्यता तपासण्यासाठी रिव्हर्स इमेज सर्च करण्यात आले. त्यानुसार काँग्रेसच्या माजी नेत्या अदिती सिंह यांनीदेखील अशीच एक साडी परिधान करून सध्या व्हायरल करण्यात येत असलेल्या फोटोसारखाच एक फोटो पोस्ट केला होता.
Fact Check: Viral Photos of YouTuber Jyoti Malhotra with Rahul Gandhi Are Fake and Morphedhttps://t.co/MZ4I1GRJA8 pic.twitter.com/iIIkFYmyMC
— DFRAC Official (@dfrac_official) May 22, 2025
आदिती सिंह यांनी 2017 साली हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. अदिती सिंह या रायबरेलीच्या खासदार होत्या. सध्या त्या भाजपात आहेत. त्यामुळे ज्योती मल्होत्रा आणि राहुल गांधी यांचा व्हायरल होत असलेला फोटो खोटा आहे. या फोटोमध्ये कोणतीही सत्यता नाही. ज्योती मल्होत्रा आणि राहुल गांधी यांची भेट झालेली नाही, हे स्पष्ट होते.
दरम्यान, भारतातील संवेदनशील माहिती पाकिस्तानला दिल्याच्या आरोपाखाली ज्योती मल्होत्राला अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत एनआयए, आयबी, मिलिटरी इन्टेलिजन्सच्या अधिकाऱ्यांनी ज्योती मल्होत्राची चौकशी केलेली आहे. ज्योती मल्होत्राचा पाकिस्तानला हेर म्हणून वापर करून घ्यायचा होता, असा पोलिसांचा दावा आहे. यूट्यूबवर ज्योती मल्होत्राचे एकूण 3.9 लाख सबस्क्रायबर्स आहेत. तिने आतापर्यंत चीन, बांगलादेश, पाकिस्तान यासह इतरही काही देशांत प्रवास केलेला आहे.