
नवी दिल्ली | 16 मार्च 2024 : गेल्या दोन निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदी हे भाजपचा सर्वात मोठा चेहरा म्हणून निवडणुकीला सामोरे गेले. दोन निवडणूका भाजपने मोदी यांच्या चेहऱ्यावर जिंकल्या. आताही 2024 च्या निवडणुकीत मोदी हेच भाजपचा आश्वासक चेहरा आहेत. दोन वेळा पंतप्रधान झालेले मोदी यंदा हॅटट्रिकच्या दिशेने निघाले आहेत. जगभरात मोदी यांच्या नावाचा गवगवा झाला आहे. जगातील प्रमुख देशांमध्ये मोदी यांचे नाव चर्चिले आजत आहे. मात्र, भारतातीलच दक्षिणेकडील राज्यांमध्ये मोदी यांची जादू चलत नाही, यामागचे कारण काय?
2014 पासून देशाच्या राजकारणात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाव सतत ठळकपणे समोर येते. प्रत्येक वेळी त्यांची चर्चा झाली, प्रत्येक मुद्दा त्यांच्या केंद्रस्थानी राहिला, ते म्हणजे नरेंद्र मोदी. विरोधकांचेही लक्ष्य मोदींवरच आहे. जगाच्या नजराही मोदी यांच्यावर आहेत. पण… मोदी यांच्यामध्ये एक कमतरता आहे ज्यामुळे त्यांचा दक्षिणेतील राज्यांमध्ये पराभव होत आहे.
पंतप्रधान मोदी यांची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांचा अनुभव. मोदींनी आपल्या राजकारणाची सुरुवात प्रचारक म्हणून केली. पोस्टर्स लावण्यापासून ते छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यापर्यंत राजकारणाची संपूर्ण एबीसीडी त्यांनी लहान वयातच आत्मसात केली. जनतेशी संबंधही त्यामुळे फार पूर्वीपासून निर्माण झाला. संघ आणि भाजपसोबत काम केल्यामुळे त्यांना संपूर्ण देशाचा दौरा करण्याची सुवर्णसंधी मिळाली.
सुरुवातीला ते राजकीय आणि भौगोलिक परिस्थिती समजून घेत. त्याचा फायदा त्यांना आजच्या काळात होत आहे. पंतप्रधान मोदी प्रत्येक रॅलीत त्या त्या परिसराची खासियत आणि तिथल्या ओळखीबद्दल बोलतात. त्यांचे ते केवळ विधान नसते तर तो त्यांचा अनुभव असतो. त्यांची दुसरी मोठी ताकद म्हणजे भाषण शैली.
भाजपमध्येच अटलबिहारी वाजपेयी, सुषमा स्वराज या नेत्यांची भाषण शैली मोठी होती. पण, 2014 पासून पंतप्रधान मोदी यांनी ती कळा वेगळ्या पातळीवर वापरली. ते अक्धी आक्रमक होतात. तर कधी भावूक होतात. त्यांच्या त्या शैलीचा भाजपला नेहमीच फायदा होत आला आहे.
नरेंद्र मोदी यांच्याकडे काही गुण असले तरी काही कमजोरीही आहेत. ज्यामुळे ते विरोधकांचे लक्ष्य बनतात. यातील सर्वात मोठी कमजोरी म्हणजे मुस्लिम समाजातील प्रतिमा आणि दक्षिण भारतात बोलल्या जाणाऱ्या भाषेची कमजोरी. त्यांचे हिंदीवर प्रभुत्व आहे. पण, स्थानिक भाषेचा विचार केला तर ते दक्षिणेत कमकुवत ठरतात. याच कारणास्तव भाजपला दक्षिणेकडील तामिळनाडू, केरळ आणि इतर राज्यांमध्ये स्थान मिळवता आले नाही.