Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना लय महागात पडली… भाजप मुख्यमंत्र्यांनी हसत हसत सगळंच सांगितलं, योजना गुंडाळणार का?…
Ladki Bahin Yojana: भाजप आणि भाजपशासित राज्यांमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मोठ्या उत्साहात सुरू झाली. नंतर या योजनेला ई-केवायसीची कात्री लावत अनेक बहिणी योजनेबाहेर फेकल्या गेल्या. आता या योजनेविषयी भाजप मुख्यमंत्र्यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

Madhya Pradesh CM Mohan Yadav : भाजप नेतृत्वातील अनेक राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना धडाक्यात सुरू करण्यात आली. पण पुढे तिजोरीवरील डोलारा वाढताच ई-केवायसीची कात्री लावण्यात आली. या योजनेतून अनेक महिला झटक्यात बाहेर फेकल्या गेल्या. पण कल्याणकारी योजनांमुळे सरकारच्या तिजोरीवर किती भार पडतो याचे बोलके उत्तर मध्य प्रदेशातील भाजप सरकारने दिले आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी एका मुलाखतीत लाडली बहन योजनेवरून एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. योजनेची अंमलबजावणी, आव्हानं आणि महिला सक्षमीकरणाविषयी त्यांनी दिलासखुलास उत्तरं दिलीत. जेव्हा आपण मुख्यमंत्री पदाची धुरा खांद्यावर घेतली, तेव्हा आपल्याला ही योजना (Ladki Bahin Yojana) इतकी खर्चिक असेल हे माहिती नव्हते, असा खुलासा त्यांनी हसत हसत केला. आर्थिक नियोजन आणि आर्थिक ताणाचे दु:खचं त्यांनी या हास्याआडून मांडले.
काय म्हणाले मुख्यमंत्री मोहन यादव?
लाडली बहन योजना, लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या आर्थिक तिजोरीवर मोठा ताण पडत असल्याची चर्चा सुरू आहे. त्यावर त्यांनी ही योजना राज्यासाठी मोठी खर्चिक ठरत असल्याचे सांगितले. राज्यातील माता-भगिनींच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी हे पाऊल अत्यंत आवश्यक असल्याचे ते म्हणाले. बहिणींच्या कल्याणासाठी सरकार कटिबद्ध आहे. कितीही आर्थिक ताण आला तरी ही योजना बंद केली जाणार नाही. ही योजना थांबवली जाणार नाही, असा शब्दही त्यांनी दिला.
काँग्रेस फ्रंटफुटवर, असा साधला निशाणा
मुख्यमंत्री मोहन यादव यांनी प्रश्नावर उत्तर देताना म्हणाले की… बेटा ही आतली गोष्ट आहे… मला काय माहिती होते की, मुख्यमंत्री होताच असा झटका बसतो? मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याचे पडसाद लागलीच उमटले. काँग्रेसने लागलीच त्यांच्यावर पलटवार केला. माजी कॅबिनेट मंत्री आणि काँग्रेस नेते उमंग सिंघर यांनी मोहन यादव यांच्यावर निशाणा साधला. निवडणूकीपूर्वी लाडक्या बहिणीच्या कल्याणाच्या गप्पा मारणारे आता सत्तेत येताच ही योजना कशी डोकेदुखी ठरत आहे, हे सांगत असल्याचा टोला लगावला. हाच भाजपचा महिला सन्मान असल्याचा दावा त्यांनी केला.
बुंदेली समागम में बोले मुख्यमंत्री डॉ मोहन यादव “लाडली बहना बहुत महंगी पड़ गई”, सवाल था बिन्नू का @bundelibauchhar का आयोजन https://t.co/sXjvEBB9uh
— Anurag Dwary (@Anurag_Dwary) October 5, 2026
थोडी मोठी हो, तुलाही योजनेचा लाभ
बिन्नु राणी या चिमुकलीने मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला होता. लाडकी बहीण योजनेची सुरूवात एक हजार रुपयांपासून झाली होती. सुरुवातीला अनेक अडचणी आल्या. पण आम्ही आता 1500 रुपये देत आहोत. चिंता करू नको. अद्याप तू या योजनेसाठी पात्र नाहीस. अजून थोडी मोठी झाली की, तुलाही या योजनेचा लाभ मिळेल, असे मोहन यादव म्हणाले.