12 दिवस 6 मृत्यू, 17 जणांवर हल्ला: रात्रीच येतो, हल्ला करतो आणि गायब होतो… अख्खं गाव का हादरलंय?
मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील लिंबई आणि आसपासच्या गावांमध्ये एका अज्ञात प्राण्याच्या हल्ल्यामुळे हाहाकार माजला आहे. 12 दिवसांत 6 जणांचा मृत्यू झाला आहे आणि 17 जण गंभीर जखमी झाले आहेत. प्राण्याची ओळख पटलेली नाही, तर मृत्यूचे कारण शोधण्यासाठी प्रयोगशाळेत तपासणी सुरू आहे.

मध्यप्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील लिंबई आणि आसपासच्या गावात एका रहस्यमयी जनावरामुळे मृत्यूची गडद छाया पसरली आहे. आतापर्यंत या जनावराने 23 जणांवर हल्ला केला आहे. त्यातील 17 जण गंभीर जखमी झाले आहेत तर 6 लोकांचा मृत्यू झाला आहे. हे जनावर रात्री येतं, हल्ला करून चावा घेतं आणि गायब होतंय… यामुळे गावातील लोक हादरून गेले आहेत. जिल्हा प्रशासन आणि गावातील लोकांच्या मनात या जनावरामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
5 मे रोजी सर्वात पहिली घटना घडली. लिंबई गावात ही घटना घडली. एका जनावराने एका रात्रीच 17 ग्रामस्थांवर हल्ला केल्यानंतर लोकांमध्ये अचानक दहशत निर्माण झाली. पण 23 मेपासून मृत्यूच्या घटना घडायला सुरु झाल्या. 23 मे रोजी तीन, 27 मे रोजी एक आणि 1 आणि 2 जून रोजी प्रत्येकी दोघांचा मृत्यू झाला.
ग्रामस्थांमध्ये गंभीर लक्षणे
या जनावराने ग्रामस्थांना चावा घेतल्यानंतर ग्रामस्थांमध्ये गंभीर लक्षणे आढळून आली आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिव्यांनी अहरवाल यांनी याबाबतची माहिती दिली आहे. 17 मे पासून 6 मृत्यू झाले आहेत. बाकी 11 जणांवर घरीच उपचार केला जात आहे. तिच परिस्थिती वरला गावात आहे. या गावात दोन केस समोर आल्या आहेत. या दोन्ही जखमींना अधिक उपचारासाठी इंदौरमध्ये रेफर करण्यात आलं आहे.
कुत्र्यासारखा दिसायचा
बडवानी डीएफओ आशिष बंसोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्यानंतर संपूर्ण परिसरात झाडाझडती करण्यात आली. पण पायाचे ठसे आढळून आले नाही. जनावराचा मृतदेही सापडला नाही. किंवा या जनावराशी संबंधित कोणताही पुरावा सापडला नाही. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, हे जनावर कुत्र्यासारखं दिसत होतं. पण त्याची स्पष्टपणे ओळख पटू शकली नाही.
प्रशासनाचा मदतीचा हात
राज्य सरकारने मृतांच्या नातेवाईकांना 8-8 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्याच वेळी, जखमींना उपचारांसह दररोज 500 रुपयांची मदतही दिली जात आहे. जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे की, प्रत्येक पीडित व्यक्तीवर लक्ष ठेवले जात आहे.
उपचारात सर्वात मोठा अडथळा
आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, रोगाची अचूक ओळख न झाल्याने योग्य उपचार करणे कठीण होत चालले आहे. मृताच्या मेंदूचा टिश्यू आणि जखमींची लाळ तपासणीसाठी पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आली आहे, जेणेकरून खरे कारण कळू शकेल.
गावांमध्ये घबराट
रहस्यमय हल्ल्यांच्या भीतीने गावकरी आता उपासनेचा अवलंब करत आहेत. गावात फिरत असलेल्या या अज्ञात आपत्तीपासून मुक्त होण्यासाठी प्रत्येक कुटुंबाकडून 100-100 रुपयांची देणगी घेऊन लिंबाई गावात यज्ञ करण्यात आला.
प्राणी की अज्ञात रोग?
12 दिवसात 6 मृत्यू, 17 हल्ले आणि हल्लेखोराचा पत्ता नाही… हे प्रकरण आता एक रहस्यमय कोडे बनले आहे. तो संक्रमित प्राणी आहे की धोकादायक विषाणूचा प्रसार आहे? प्रशासन आणि आरोग्य विभागासमोर हे सर्वात मोठे आव्हान आहे.
