President ADC Major Navya Shekhawat : राष्ट्रपतींच्या पहिल्या महिला ADC मेजर नव्या शेखावत; पगार किती, VVIP सुविधांमध्ये नेमकं काय मिळणार?
President Female ADC Major Navya Shekhawat : राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातील मेजर नव्या शेखावत यांनी भारतीय लष्कराच्या इतिहासात नवा अध्याय रचला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या ADC पदाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या त्या देशातील पहिल्या महिला लष्करी अधिकारी ठरल्या आहे.

राजस्थानच्या सीकर जिल्हयातील लेकीने भारतीय लष्कराच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नाव कोरले आहे. मेजर नव्या शेखावत यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या ADC पदाची सूत्रे स्वीकारली आहेत. या सर्वोच्च पदावर विराजमान होणाऱ्या त्या देशातील पहिल्या महिला लष्करी अधिकारी ठरल्या आहेत. युपीएससी सीडीएस परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर चेन्नई येथील अधिकारी प्रशिक्षण अकादमीत खडतर प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या नव्या यांनी अवघ्या पाच वर्षांच्या अल्पावधीच्या काळातच ही उत्तुंग कामगिरी करून दाखवली आहे. राष्ट्रपतींच्या अत्यंत जवळच्या आणि अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या या पदावर नियुक्ती झाल्याने देशभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
मेजर नव्या शेखावत यांचा पगार किती?
भारतीय लष्करातील अधिकाऱ्यांचे वेतन त्यांच्या रँकनुसार ठरवले जाते. सध्या मेजर हुद्द्यावर कार्यरत असलेल्या नव्या शेखावत सातव्या वेतन आयोगाच्या लेव्हल-11 अंतर्गत येतात. या श्रेणीत मेजर पदावरील अधिकाऱ्याचे सुरुवातीचे मूळ वेतन 59 हजार 700 रुपये प्रति महिना इतके असते. याशिवाय दरमहा 15 हजार 500 रुपयांचे मिलिटरी सर्व्हिस पे , महागाई भत्ता आणि इतर लष्करी भत्ते मिळवून मेजर दर्जाच्या अधिकाऱ्याला महिनाकाठी 1.2 लाख ते 1.5 लाख रुपये किंवा त्याहून अधिक एकूण वेतन मिळते. आता राष्ट्रपती भवनात ADC म्हणून नियुक्ती झाल्याने त्यांना विशेष लष्करी सेवा आणि व्हीव्हीआयपी प्रोटोकॉल संबंधित अतिरिक्त भत्ते देखील लागू होणार आहेत.
मिळणार VVIP दर्जा आणि विशेष सुविधा
राष्ट्रपतींच्या ADC म्हणून कार्यरत असताना मेजर नव्या शेखावत यांना अत्यंत उच्च दर्जाच्या आणि प्रतिष्ठेच्या सरकारी सुविधा पुरवल्या जातील. त्यांना राष्ट्रपती भवन परिसरात अथवा अगदी जवळ व्हीव्हीआयपी दर्जाची निवासव्यवस्था मिळणार असून, वीज, पाणी आणि देखभालीचा सर्व खर्च सरकारतर्फे केला जाईल. राष्ट्रपतींच्या अधिकृत दौऱ्यांमध्ये सावलीसारखे सोबत राहावे लागत असल्याने त्यांना विशेष सुरक्षित वाहनव्यवस्था पुरवली जाते. याव्यतिरिक्त लष्करी नियमांनुसार त्यांना व त्यांच्या कुटुंबाला मोफत सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा, उच्च-स्तरीय विमा संरक्षण आणि सेवानिवृत्तीनंतर मिळणारे निवृत्तीवेतनासह सर्व प्रमुख लाभ देण्याबाबतची तरतूद आहे.
