‘गळा कापून टाकेन, पण भाजपसमोर झुकणार नाही’, ममता बॅनर्जींचा घणाघात

| Updated on: Jan 25, 2021 | 5:25 PM

ममता यांची हुगळी इथं एक सभा पार पडली. त्यावेळी उपस्थित जनतेला संबोधित करताना त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला.

गळा कापून टाकेन, पण भाजपसमोर झुकणार नाही, ममता बॅनर्जींचा घणाघात
Follow us on

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा ज्वर आतापासूनच चढल्याचं पाहायला मिळत आहे. कोलकाता इथं 23 जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात ममता बॅनर्जी यांच्यासमोरच जय श्रीरामाच्या घोषणा देण्यात आल्या. तेव्हा संतापलेल्या ममता बॅनर्जी यांनी भाषण देण्यास नकार दिला. पण त्या प्रकारावर बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘माझा गळा कापून टाकेन पण भाजपसमोर झुकणार नाही’, जणू अशी प्रतिज्ञाच ममता बॅनर्जी यांनी घेतली आहे. सोमवारी ममता यांची हुगळी इथं एक सभा पार पडली. त्यावेळी उपस्थित जनतेला संबोधित करताना त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला.(Mamata Banerjee criticizes BJP at a public meeting in Kolkata)

23 जानेवारीला व्हिक्टोरिया मेमोरियलमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती समारोहात उपस्थित लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी यांच्यासमोर जय श्रीरामाच्या घोषणा दिल्या. त्यावेळी ममता बॅनर्जी यांना संताप अनावर झाला आणि त्यांनी भाषण करण्यास नकार दिला. त्यावर ममता यांनी सोमवारी प्रतिक्रिया देताना ‘त्या लोकांनी पंतप्रधान मोदींच्या समोर मेरा अपमान केला. मी बंदुकीवर नाही तर राजकारणावर विश्वास ठेवते. भाजपने नेताजी आणि बंगालचा अपमान केला आहे’, अशा शब्दात भाजपवर निशाणा साधला आहे.

‘जर त्यांनी नेतांजी सुभाषचंद्र बोस यांचा जयजयकार केला असता तर मी त्यांना सलाम केला असता. पण तुम्ही मला बंदुकीच्या इशाऱ्यावर ठेवण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला कसं प्रत्युत्तर द्यायचं हे मला ठाऊक आहे. मी गळा कापून टाकेन पण भाजपसमोर झुकणार नाही’, असा घणाघात ममता बॅनर्जी यांची कोलकाता इथं केलाय.

व्हिक्टोरिया मेमोरियलमध्ये नेमकं काय घडलं?

ममता बॅनर्जी भाषणाला उभ्या राहताच ‘भारत माता की जय’ आणि ‘जय श्रीरामचे नारे’ सुरू झाले. त्यामुळे ममता बॅनर्जी या प्रचंड भडकल्या. भाषणापूर्वीच सुरू झालेल्या या घोषणेमुळे नाराज झालेल्या ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानांसमोरच घोषणा देणाऱ्यांना सुनावलं. मला वाटतं हा शासकीय कार्यक्रमाची काही शिस्त पाळायला हवी. हा शासनाचा कार्यक्रम आहे. एखाद्या राजकीय पक्षाचा कार्यक्रम नाही. हा सर्व पक्षीय आणि पब्लिक प्रोग्राम आहे. कोलकात्यात हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी पंतप्रधान आणि सांस्कृतिक मंत्रालायची आभारी आहे. एखाद्याला आमंत्रित करून त्याचा अपमान करणं तुम्हाला शोभत नाही. या घटनेचा निषेध म्हणून मी आता भाषणच करणार नाही. जय हिंद, जय बांगला, असं म्हणत ममता बॅनर्जी यांनी भाषण आटोपतं घेतलं. त्यामुळे उपस्थितांमध्ये एकच शांतता पसरली.

संबंधित बातम्या : 

दिल्लीतच देशाची राजधानी का?, कोलकातासहीत देशातील चार ठिकाणी राजधानी बनवा: ममता बॅनर्जी

Special Report : नंदिग्राम ममता बॅनर्जींसाठी गेमचेंजर ठरणार?

Mamata Banerjee criticizes BJP at a public meeting in Kolkata