संजय दत्तच्या घरातून मोठी बातमी… बहिणीने घेतला मोठा निर्णय; आता थेट…
संजय दत्तची बहीण ममता दत्त यांनी जेडीयूमध्ये प्रवेश करत पंजाब राजकारणात पाऊल ठेवले आहे. जेडीयूने पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी शिरोमणी अकाली दल श्री आनंदपूर साहिबसह (एसएडीएसएएस) युती केली आहे. ममता दत्त या सामाजिक कार्यकर्त्या असून, आता त्या राजकारणातून समाजसेवा करण्याचा मानस व्यक्त करत आहेत.

नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील जनता दल (यूनायटेड)ने पंजाब विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. नितीश कुमार यांनी पंजाबमध्ये भाजपची साथ सोडून शिरोमणी अकाली दल श्री आनंदपूर साहिबसोबत (एसएडीएसएएस) युती करण्याचा निर्णय निर्णय घेतला आहे. ही राजकीय चर्चा सुरू असतानाच अभिनेता संजय दत्तच्या घरातूनही मोठी बातमी आली आहे. संजय दत्त यांची चुलत बहीण ममता दत्त यांनी जेडीयूमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे पंजाबमधील राजकीय हवा चांगलीच तापली आहे.
एसएडीएसएएस आणि जेडीयू एकत्रितपणे विधानसभेची निवडणूक लढणार आहे. जेडीयू पंजाबचे प्रदेश अध्यक्ष मलविंदर सिंह बेनीपाल यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. समान विचारधारा असणाऱ्या लोकांना एकाच मंचावर आणण्यासाठी आम्ही आघाडी केली आहे, असं बेनीपाल यांनी म्हटलं आहे. एसएडीएसएएसचे अध्यक्ष दविंदर सिंग आणि महासचिव गुरदर्शन यांनी मलविंदर सिंग यांचं समर्थन केलं आहे. पंजाबमध्ये आम्हाला मजबूत आघाडी निर्माण करायची आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही एकत्रितपणे प्रश्नांवर आवाज उठवणार असून राज्यात आमच्या पक्षांचा विस्तार करणार असल्याचं दविंदर सिंग म्हणाले.
दरम्यान या दोन्ही आघाडीकडून राज्यात 117 जागांवर उमेदवार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. किमान समान कार्यक्रमावर या दोन्ही पक्षांकडून प्रचार केला जाणार आहे. तसेच लढवण्यात येणाऱ्या सर्वच जागा कशा निवडून येतील यावर भर दिला जाणार आहे. खासकरून माझा, दोआबा, लुधियाना, जीटी रोड आणि राजापुरा पटियाला आदी भागांवर आमचा फोकस राहिल असंही त्यांनी स्पष्ट केलं.
ममता दत्त कोण आहेत?
केवळ दिवंगत नेते, अभिनेते सुनील दत्त यांची पुतणी किंवा संजय दत्तची चुलत बहीण एवढीच ममता दत्त यांची ओळख नाहीये. तर ममता दत्त या आत्मनिर्भर आहेत. ममता दत्त यांनी कॉर्पोरेट क्षेत्रात काम केलं आहे. गेल्या एक दशकापासून त्या पशू कल्याण्यासाठी काम करत आहेत. दत्त फाऊंडेशन फॉर सोशल वेल्फेअरच्या त्या संस्थापक आहेत. सामाजिक कल्याणाच्या कामात त्या आघाडीवर असतात. समाजात सार्थक बदल घडवून आणायचा असेल तर सक्रिय भागिदारी असली पाहिजे. तसेच सेवेची गरज आहे. सामाजिक कामाने मला करुणा आणि जबाबदारीचं महत्त्व समजावलं आहे. जेडीयूमध्ये प्रवेश केल्याने मी याच मूल्यांना घेऊन पुढे जाणार आहे. तसेच सार्वजनिक जीवनात रचनात्मक योगदान देण्याचा प्रयत्न करणार आहे, असं ममता दत्त म्हणाल्या. पटना येथील सक्रिय सामाजिक कार्यकर्ते आणि प्रसिद्ध वकील देविंदर राजपूत यांनीही जेडीयूमध्ये प्रवेश केला आहे. राजपूत यांनी मागची निवडणूक अपक्ष म्हणून लढली होती.
