11 वर्षात भारतातील मेट्रो नेटवर्कमध्ये मोठी वाढ, 248 किमीवरुन 1013 किमीवर पोहोचले
2000 च्या दशकाच्या सुरुवातीला दिल्ली आणि काही मोजक्या शहरांमध्ये मेट्रोची सुरुवात झाली होती. आता हे मेट्रो जाळे 20 पेक्षा जास्त शहरांमध्ये पसरले आहे. मेट्रोचा हा विस्तार शहरी जागृतीचे एक प्रतीक आहे.

भारतातील विकासाचा वेग चांगलाच वाढला आहे. 2000 च्या दशकाच्या सुरुवातीला दिल्ली आणि काही मोजक्या शहरांमध्ये मेट्रोची सुरुवात झाली होती. आता हे मेट्रो जाळे 20 पेक्षा जास्त शहरांमध्ये पसरले आहे. मेट्रोचा हा विस्तार शहरी जागृतीचे एक प्रतीक आहे. मेट्रोमुळे प्रवास वेगवान व सुखरूप झाला आहे. मेट्रो आता केवळ वाहतुकीचे साधन राहिलेले नाही; ती भारताच्या विकासाच्या कथेच्या केंद्रस्थानी असलेली जीवनरेखा आहे. भारत आता जगातील तिसरे सर्वात मोठे मेट्रो नेटवर्क म्हणून अभिमानाने उभा आहे.
मेट्रो मार्गात वाढ
भारतात 2014 पर्यंत 5 शहरांमध्ये केवळ 248 किमी मार्गावर मेट्रो धावत होती, मात्र 2025 मध्ये शहरांची संख्या 23 वर पोहोचली आहे. सध्या भारतात 1013 किमी मेट्रो मार्ग आहे. केवळ 11 वर्षांत 763 किमी मेट्रो मार्ग वाढला आहे. सरासरी दैनिक प्रवासी संख्या 28 लाख (2014 ) वरून 1.12 कोटींहून अधिक झाली आहे. 2014 पूर्वी एका महिन्यात 0.68 किमी मार्गाचे काम केले जात होते. मात्र आज महिन्यात 6 किमी मेट्रो मार्ग उभारला जात आहे.
सरकारने उचलली महत्त्वाची पावले
सरकारने शहरी वाहतुकीला गती देण्यासाठी आणि शाश्वत वाहतूक उपाय शोधण्यासाठी अनेक परिवर्तनकारी उपक्रम सुरू केले आहेत. मेट्रो प्रकल्प तांत्रिकदृष्ट्या प्रगत बनवण्यात आले आहेत. यामागे सरकारची दूरदर्शी धोरणे, गुंतवणूक दिसून येते. सरकार स्वच्छ, जलद आणि अधिक कनेक्टेड शहरी भविष्याचा पाया रचत असल्याचे समोर येत आहे.
पाण्याखालील मेट्रो
2024 मध्ये, भारताने कोलकाता येथे पहिला पाण्याखालील मेट्रो बोगद्याचे काम सुरू करून एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. हा बोगदा हुगळी नदीखालील एस्प्लेनेड ते हावडा मैदान या स्टेशनला जोडणार आहे. हे अभियांत्रिकीचा एक चमत्कार आणि भारताच्या वाढत्या तांत्रिक आणि पायाभूत सुविधांच्या क्षमतेचे प्रतीक आहे.
पाण्यातील मेट्रो
केरळमधील कोची शहर हे पाण्यात मेट्रो सुरू करणारे भारतातील पहिले शहर बनले आहे. ही मेट्रो अखंड आणि पर्यावरणपूरक वाहतुकीसाठी खास आहे. यात इलेक्ट्रिक-हायब्रिड बोटी वापरून 10 बेटांना जोडण्यात आले आहे.
प्लॅटफॉर्म स्क्रीन डोअर (PSD)
प्लॅटफॉर्म स्क्रीन डोअर बसवण्यात आले आहेत. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र वाहतूक महामंडळ (NCRTC) यांनी संयुक्तपणे विकसित केले आहे. प्रवाशांची सुरक्षितता वाढवते आणि प्लॅटफॉर्म संदर्भातील अपघात कमी करणे हा आहे.
नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड
नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड हे एक राष्ट्र, एक कार्ड अंतर्गत बनवण्यात आले आहे. मेट्रो, बस, उपनगरीय रेल्वे, टोल याद्वारे भरता येतो. तसेच बऱ्याच ठिकाणी क्यू आर द्वारे तिकीट बूक करता येते.
