कोणती कंपनी एकाच वर्षात एवढी सॅलरी कुठे वाढवती का राव? मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांची पगारवाढ ऐकून बसेल धक्का
मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला (Satya Nadella) यांच्या पगारामध्ये कंपनीने विक्रमी वाढ केली आहे. त्यांच्या कामाची दखल घेत, कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे. त्यांचं नवं पॅकेज ऐकून अनेकांना धक्का बसला आहे.

मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला (Satya Nadella) यांच्या पगारामध्ये कंपनीने विक्रमी वाढ केली आहे. नडेला यांना 2025 मध्ये जवळपास 96.5 मिलियन डॉलर म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये तब्बल 846 कोटी रुपयांचं पॅकेज मिळालं आहे. मायक्रोसॉफ्टने (AI) आर्टिफिशियल इंटेलिजेंस क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे, याची दखल घेत सत्या नडेला यांच्या पगारामध्ये विक्रमी वाढ करण्यात आली आहे. काही दिवसांमध्येच मायक्रोसॉफ्टने ‘एआय’ अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजेंस क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. याचाच इनाम म्हणून सीईओ सत्या नडेला यांचा पगार वार्षिक आधारावर तब्बल 22 टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये देखील मोठी तेजी आल्याचं पहायला मिळत आहे.
कंपनीच्या रेकॉर्डनुसार आर्थिक वर्ष 2025 मध्ये नडेला यांची कमाई आता 96.5 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 846 कोटी रुपये एवढी झाली आहे. जी गेल्या वर्षीच्या तुलनेत खूप जास्त आहे. कंपनीने यातील 90 टक्के हिस्सा शेअर्सच्या रुपाने दिला आहे.ब्लूमबर्गच्या एका रिपोर्टनुसार गेल्या वर्षी सत्या नडेला यांचं सॅलरी पॅकेज 79.1 मिलियन डॉलर म्हणजेच 694 कोटी रुपये एवढं होतं. त्यामध्ये आता 22 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे, त्यामुळे आता सत्या नडेला यांचं पॅकेज 79.1 मिलियन डॉलर वरून थेट 96.5 मिलियन डॉलरवर पोहोचलं आहे. म्हणजेच त्यांना आता वार्षिक आधारावर 846 कोटी रुपयांचं पॅकेज मिळणार आहे. मायक्रोसॉफ्टच्या वार्षिक रिपोर्टनुसार सत्या नडेला यांचं बेसिक वेतन 2.5 मिलियन डॉलर एवढं आहे, जे त्यांच्या पगाराच्या दहा टक्के एवढं आहे, तर उर्वरीत हिस्सा हा त्यांना शेअर्स आणि इंसेंटिव्हच्या रुपानं देण्यात आला आहे.
याबाबत बोलताना कंपनीने म्हटलं आहे की, सत्या नडेला यांच्या नेतृत्वात कंपनीने AI तंत्रज्ञानामध्ये मोठी झेप घेतली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात मायक्रोसॉफ्टने आपली एक वेगळी ओळख बनवली आहे. OpenAI मध्ये गुंतवणूक आणि Copilot सारख्या एआय सेवांमुळे कंपनीने या क्षेत्रात आपलं मजबूत स्थान निर्माण केलं आहे. सत्या नडेला हे 2014 पासून या कंपनीचे सीईओ आहेत, त्यांच्या पगारामध्ये यावर्षी मोठी वाढ करण्यात आली आहे.
