शिक्षणाला वय नसतंच, आमदार आईचे मुलीकडून शिक्षणाचे धडे, रामबाई दहावी पास होणार?

मध्यप्रदेशच्या महिला आमदार रामबाई मुक्त विद्यापीठातून दहावीची परीक्षा देत आहेत. विशेष म्हणजे त्यांची मुलगी मेघा परिहार त्यांना अभ्यासाचे धडे देत आहे (MLA Rambai giving 10th exam). 

शिक्षणाला वय नसतंच, आमदार आईचे मुलीकडून शिक्षणाचे धडे, रामबाई दहावी पास होणार?
| Updated on: Dec 20, 2020 | 4:41 PM

भोपाळ : प्रत्येक व्यक्तीसाठी शिक्षण प्रचंड महत्त्वाचं आहे (MLA Rambai giving 10th exam). समाजातील सर्व घटकांचं शिक्षण झालं तर समाज पुरोगामित्वाकडे जातोय, असं म्हटलं जातं. समाज सुशिक्षित झाला तर देशाचाही विकास होतो. याशिवाय बरेच सामाजिक प्रश्नदेखील शिक्षणामुळे सूटतात. शिक्षणाला कधीच वय नसतं. आपण कुठल्याही वयात शिक्षण घेऊ शकतो. हीच गोष्ट लक्षात घेऊन मध्यप्रदेशच्या महिला आमदार रामबाई मुक्त विद्यापीठातून दहावीची परीक्षा देत आहेत. विशेष म्हणजे त्यांची मुलगी मेघा परिहार त्यांना अभ्यासाचे धडे देत आहे (MLA Rambai giving 10th exam).

मध्यप्रदेशात पोटनिवडणुका संपल्यानंतर बसपा आमदार रामबाई यांनी सध्या राजकारणातून ब्रेक घेतला आहे. त्या सध्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा अभ्यास करत आहेत. रामबाई दमोह जिल्ह्याच्या पथरिया विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत. काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशमध्ये प्रचंड राजकीय घडामोडी घडल्या. रामबाई या मार्च महिन्यात गुरुग्रामच्या एका हॉटेलमध्ये थांबल्या होत्या. रामबाई यांना काँग्रेस सत्तेत असताना आणि नंतर भाजप सरकार आल्यावर मंत्रिपदाची आशा होती. मात्र, त्यांना मंत्रिपद मिळालं नाही. राजकारणातील डावपेच खेळल्यानंतर रामबाई आता स्वत:च्या शिक्षणाकडे लक्ष देत आहेत.

रामबाई यांनी ‘टाईम्स ऑफ इंडिया’सोबत बातचित करताना आपल्या दहावीच्या परीक्षेविषयी माहिती दिली. “माझी मुलगी मेघा परिहार या दिल्ली विद्यापीठात इतिहास विषयाचं शिक्षण घेत आहेत. त्याच माझ्या गुरु आहेत. मी आतापर्यंत 3 पेपर दिले आहेत. रविवारी माझी तोंडी परीक्षा आहे. मी सध्या माझ्या अभ्यासात लक्ष केंद्रीत करत आहे”, असं रामबाई यांनी सांगितलं.

“माझी आई विज्ञान विषयात थोडी कमजोर आहे. विज्ञानाची काही सूत्रे पाठ करणं त्यांना अवघड जातं. त्यांची इंग्रजी ठीक आहे. तर हिंदी त्यांची खूप चांगली आहे”, अशी प्रतिक्रिया रामबाई यांच्या कन्या मेघा परिहार यांनी दिली. मेघा दिल्लीत स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहे.

दरम्यान, आमदार रामबाई यांनी आपल्याला शिक्षणाची आवड असल्याचं सांगितलं. “माझं शिक्षण फक्त माध्यमिक वर्गापर्यंत झालं. आमच्या गावात शाळा नसल्याने माझं शिक्षण होऊ शकलं नाही. दुसऱ्या गावातील शाळेत शिक्षणासाठी जाण्यासाठी दररोज नदी ओलांडावी लागायची. त्यामुळे मी शिक्षण सोडलं”, असं रामबाई यांनी सांगितलं. दरम्यान, आता मुलगी आणि पतीने शिक्षणासाठी प्रोत्साहित केल्याने शिक्षण करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिली.

“माझी औपचारिकपणे शाळा जरी सुटली तरी अनेक अनुभवांमधून खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. विधानसभेचं कामकाजांसाठी शिक्षण जरुरीचं आहे”, असं रामबाई यांनी सांगितलं.

हेही वाचा : BMW कार घेण्याच्या हौसेला मुरड, पंढरपूरच्या डॉक्टरांचे लहान मुलांच्या ह्रदयावर मोफत उपचार