BMW कार घेण्याच्या हौसेला मुरड, पंढरपूरच्या डॉक्टरांचे लहान मुलांच्या ह्रदयावर मोफत उपचार
पंढरपूरचे बालरोग तज्ज्ञ डॉ. शितल शहा यांनी गोरगरीबांच्या लहान मुलांसाठी महागडी उपकरणे घेतली

पंढरपूर : महागड्या, आलिशान गाड्या चालवण्याची हौस अनेकांना असते, मात्र बऱ्याच जणांना आर्थिक गणित जुळवता न आल्यामुळे इच्छेला मुरड घालावी लागते. पंढरपूरच्या बालरोग तज्ज्ञांनी ऐपत असतानाही बीएमडब्ल्यू कार खरेदीची आकांक्षा बाजूला ठेवली. सामाजिक बांधिलकी जपत पंढरपूरचे बालरोग तज्ज्ञ डॉ. शितल शहा यांनी गोरगरीबांच्या लहान मुलांसाठी महागडी उपकरणे घेतली. अत्यावश्यक आणि तातडीचे मोफत उपचार करण्यासाठी दोन कोटी रुपयांचे कॅथलेब आणि हार्ट अँड लंग्स ही दोन प्रकारची अत्याधुनिक उपकरणे त्यांनी उपलब्ध केली. (Pandharpur Doctor Shital Shah choses to buy Heart instruments for children over BMW Car)
डॉ. शितल शहा यांच्या स्तुत्य निर्णयामुळे मुंबई-पुण्यानंतर पहिल्यांदाच पंढरपुरातही लहान मुलांच्या ह्रदयावर शस्त्रक्रिया करणे सोपे झाले आहे, तेही अगदी मोफत.
बीएमडब्ल्यू घेण्याच्या इच्छेला मुरड
“मला दोन कोटी रुपयांची बीएमडब्ल्यू गाडी खरेदी करायची होती, पण विचार केला महागड्या गाडीत बसून फक्त मलाच त्याचा आनंद घेता येईल. परंतु त्याऐवजी याच दोन कोटी रुपयांची लहान मुलांच्या उपचारासाठी लागणारी अत्याधुनिक उपकरणे खरेदी केली, तर त्याचा अनेक गोरगरीबांना उपयोग होईल. याच भावनेतून ही उपकरणे खरेदी केली” असे बालरोग तज्ज्ञ डॉ. शितल शहा यांनी सांगितले.
शेकडो बालकांची मोफत तपासणी
रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून आरोग्य सेवा करणाऱ्या डॉ. शहा यांनी महागडी उपचार पद्धती असलेली शस्त्रक्रिया मोफत करुन देण्याचा सामाजिक उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाला आज सुरुवात झाली असून मोफत बाल ह्रदयरोग निदान आणि उपचार शिबीराचे आयोजन केले आहे. या शिबीरात एका दिवसात 100 हून अधिक बालकांची मोफत तपासणी करुन त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
महाराष्ट्रातील अग्रणीचे सेवाभावी डॉक्टर
या शिबीरामुळे गोरगरीबांचे लाखो रुपये वाचले आहेत. शिवाय त्यांना मोठा आर्थिक आणि मानसिक आधारही या निमित्ताने मिळाला आहे. ह्रदयावर उपचार करण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करावा लागतो. परंतु डॉ. शहा यांनी गोरगरीबांच्या लहान मुलांचे जीव वाचवण्यासाठी अगदी मोफत सेवा सुरु केली आहे. अशा प्रकारची मोफत रुग्णसेवा करणारे डॉ. शहा हे महाराष्ट्रातील अग्रणीचे सेवाभावी डॉक्टर ठरले आहेत.
लॉकडाऊन काळात देखील त्यांनी हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांसोबत त्यांच्या नातेवाईकांना मोफत अन्नदान केले होते. अनेक सामाजिक उपक्रमातून त्यांनी गोरगरीब रुग्णांसाठी सेवा सुरु केली आहे. त्यांच्या सेवाभावी उपक्रमाचे राज्यभरातून कौतुक केले जात आहे.
101 वऱ्हाडींचे रक्तदान, धुळ्यात पाटलांच्या लग्नसोहळ्यात सामाजिक बांधिलकीhttps://t.co/2wt7iL9bC1#marriage #MarriageStory
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 20, 2020
(Pandharpur Doctor Shital Shah choses to buy Heart instruments for children over BMW Car)
